जळगाव : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील उन्हाळी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी फेर परीक्षा नुकतीच २३ ते २५ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षांचे निकाल घोषित करण्यात येत असून आतापर्यंत ८०८ विषयांपैकी पाचशेच्यावर विषयांचे निकाल जाहीर करण्यात आले असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक किशोर पवार यांनी दिली.
८ जून २०२१ पासून ते ३१ जुलै, २०२१ पर्यंत झालेल्या (उन्हाळी) झालेल्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहे. या परीक्षेमधील बहि:स्थ लेखी व बहि:स्थ प्रात्यक्षिक परीक्षांना अनुपस्थित किंवा नापास झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला होता. त्यानुसार बहि:स्थ लेखी परीक्षा २३ ते २५ ऑगस्ट या कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ६ या दरम्यान, ऑनलाईन पद्धतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (एमसीक्यू) स्वरूपात घेण्यात आली. एकूण ८०८ विषयांचे पेपर विद्यार्थ्यांनी दिले तर खान्देशातून ४ हजार ९२४ विद्यार्थ्यांनी फेर परीक्षा दिली.
७० टक्के निकाल जाहीर
२३ ते २५ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आलेली ऑनलाइन फेरपरीक्षा ही सुरळीत पार पाडण्यात आली़ तर ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक व्यत्यय येत होता, अशांच्या मदतीसाठी आयटी समन्वयकांची नेमणूक करण्यात आली होती. दरम्यान, परीक्षा संपताच, विद्यापीठाकडून निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियाही सुरू करण्यात आली. आतापर्यंत ७० टक्के फेरपरीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहे. अर्थात ८०८ विषयांपैकी पाचशेच्यावर विषयांचे निकाल जाहीर झाले आहे. उर्वरित निकाल लवकरच जाहीर होतील, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.