दापोरा ता. जळगाव : दापोरा येथील गिरणा नदीपात्रातील सन २१-२२ साठी वाळूचा लिलाव करण्यासाठी तहसीलदार जळगाव यांनी विशेष ग्रामसभा घेऊन ठराव पाठविण्याचे सूचित केले होते त्यानुसार ९ रोजी सरपंच कविता ज्ञानेश्वर वाणी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत आवारात विशेष ग्रामसभा घेण्यात आली. सभेच्या कामकाजास ग्रामसेवक यांनी सुरूवात करून सदरील विषय महसूल खात्याचा असल्याने तलाठी सारिका दुरगुडे यांनी सभेसमोर दापोरा येथील गिरणा नदीपात्रातील सन २१-२२ साठीचा वाळू लिलाव करणे बाबत चर्चा करण्यात येऊन सर्वानुमते दापोरा येथील गिरणा पात्रातील वाळू लिलाव न करण्याचा ठराव सर्वांनी पारित केला.
ग्रामसभेत इतरही विषयावर चर्चा
गावातील महिला शौचालयाची झालेली दुरवस्था, गावातील मोठ्या प्रमाणात सुरू असलेली हातभट्टीची दारू बंद करावी त्यामुळे मोठ्या प्रमाणात तरुण मुले देखील व्यसनाधीन होत आहेत, भारत निर्माण योजनेची चौकशी करणे, ग्रामपंचायत हद्दीतील अवैधरित्या सुरू असलेल्या खदानी बंद करणे, गावातील दिवाबत्तीसह इतर आरोग्याच्या प्रश्नावर चर्चा झाली. सभेस सरपंच कविता वाणी, उपसरपंच गोविंदा तांदळे, तलाठी सारिका दुरगुडे, ग्रामसेवक दिलीप पवार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो –दापोरा येथील ग्रामसभेत ग्रामपंचायत आवारात उपस्थित ग्रामस्थ.