मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षांच्या मुलाखतीसाठी दिल्लीत येणार्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सदनात पूर्वीप्रमाणेच सवलतीच्या दरात सात दिवसांच्या कालावधीसाठी वास्तव्य करण्याची सवलत देण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी दिले. आधी ही सवलत सात दिवसांचीच होती. मात्र २०१२ मध्ये ती तीन दिवसांची करण्यात आली होती. ती पुन्हा सात दिवसांची करण्याचे आदेश मुख्यमंत्री चव्हाण यांनी राजशिष्टाचार विभागाचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांच्याशी चर्चा करून दिले. त्यामुळे संबंधित विद्यार्थी सवलीतीच्या दरात (५० रुपये रोज) सात दिवसांसाठी राहू शकतील. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय किंवा आप्तेष्टही त्यांना लागू असलेल्या सवलतीच्या दरात (७५० रुपये रोज) राहू शकतील. राजशिष्टाचार विभागाने या बाबत महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्तांना तातडीने सूचना दिल्या. (विशेष प्रतिनिधी)
महाराष्ट्र सदनातील सवलत पूर्वीप्रमाणे
By admin | Updated: May 5, 2014 21:06 IST