लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दुसऱ्या लाटेतील ॲक्टिव्ह केसेसच्या दीडपटीने संभाव्य तिसऱ्या लाटेत रुग्ण वाढू शकतात, असा अंदाज वर्तवून त्या दृष्टीने नियोजन करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रशासनाला गुरुवारी पत्र दिले आहे. आधीही असे पत्र आले होते. त्याबाबतचे गुरुवारी स्मरणपत्र आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. दरम्यान, रुग्ण वाढले तरी प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
दुसऱ्या लाटेत सक्रिय रुग्णांची संख्या १४ हजारांपर्यंत गेली होती. त्या दृष्टीने २२ ते २३ हजार रुग्ण तिसऱ्या लाटेत समोर येऊ शकतात, असा हा अंदाज वर्तवून त्याबाबतच्या सूचना काही महिन्यांपूर्वी आल्या होत्या. त्याबाबतचे दुसरे पत्र आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ऑक्सिजन प्रकल्पांना मात्र, ट्रान्स्फाॅर्मर नसल्याने कार्यान्वित होत नसल्याची माहिती आहे. दुसरीकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने दुसऱ्या टँकसाठी नव्याने निविदाप्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे.
मोहाडीत ६५० बेड
मोहाडी रुग्णालयात ऑक्सिजन पाइपलाइन अंतर्गतच ६५० बेड तयार होत आहेत. शिवाय, अन्य ठिकाणचे नियोजन असे साडेपाच हजारांवर ऑक्सिजन बेड उपलब्ध राहणार आहेत. त्यातच ऑक्सिजन प्रकल्पांचे ८० ते ९० टक्के काम झाले असून, ट्रान्स्फाॅर्मरचा प्रश्न सुटल्यानंतर ते कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे रुग्ण वाढले तरी प्रशासन सज्ज असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले. एकत्रित परिस्थिती व वातावरण बघता यापुढे कधीही तिसरी लाट येऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे.
दोन महिन्यांमध्येच पीक पीरेड
दोनही लाटांची तुलना केल्यास लागण सुरू झाल्यापासून दोन महिन्यांमध्येच अधिक रुग्णवाढ व मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यानुसार पहिल्या लाटेत ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात ३७७७ रुग्ण आढळून आले होते, तर ६६६ मृत्यू झाले होते. दुसऱ्या लाटेत मार्च व एप्रिल हे दोन महिने अधिक भयावह ठरले होते. यात ६१ हजार १२६ रुग्ण दोनच महिन्यात समोर आले होते. तर दोन महिन्यांत ७५० पेक्षा अधिक मृत्यू नोंदविण्यात आले आहेत.
दोन महिन्यांपासून दिलासा
ऑगस्ट महिन्यातील रुग्ण : ९८
ऑगस्ट महिन्यातील मृत्यू :००
१० सप्टेंबरपर्यंत रुग्ण : २५
१० सप्टेंबरपर्यंत मृत्यू : ००
गेल्या वर्षीची स्थिती
ऑगस्ट महिन्यातील रुग्ण : १६,४८८
ऑगस्ट महिन्यातील मृत्यू : २९५
सप्टेंबर महिन्यातील रुग्ण : २०,५८९
सप्टेंबर महिन्यातील मृत्यू : ३७१