लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बाधितांचे प्रमाण काढण्यासाठी अर्थात पॉझिटिव्हिटी काढण्यासाठी आता आरटीपीसीआर अहवालात बाधित आलेल्यांचीच संख्या ग्राह्य धरली जात आहे. या निकषानुसार जिल्ह्याची पॉझिटिव्हिटी ही सोमवारी प्रथमच शून्य टक्के नोंदविण्यात आली आहे. आरटीपीसीआरच्या ४७१ अहवालांमध्ये एकही बाधित रुग्ण आढळून आलेला नाही.
जिल्हाभरात ४ बाधित आढळून आले आहेत. तर जळगाव शहरात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या १६ वर गेली असून सोमवारी बाधित आढळून आलेले चारही रुग्ण हे ॲन्टीजन तपासणीतच समोर आले आहेत. यात चाळीसगावात २ तर जळगाव शहर व भुसावळ या ठिकाणी प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला आहे. दरम्यान, बोदवड व एरंडोल तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या शून्यावर कायम असून बोदवडला आठवड्याचा अवधीनंतरही रुग्ण आढळून आलेला नाही. सलग २८ दिवस असेच चित्र राहिल्यास बोदवड कोरानातून मुक्त घोषित होणार आहे.