लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शाडूमातीच्या मूर्तींची किंमत खूप जास्त असते. त्यामुळे इच्छा असूनही अनेक भाविकांना या मूर्ती विकत घेता येत नाही. हीच बाब लक्षात घेऊन पाळधी, ता.धरणगाव येथील तरुणांनी एकत्र येत शहरातील गोविंदा रिक्षा चौकात स्टॉल लावला आणि शाडू मातीची मूर्ती भाविकांना उपलब्ध करून दिली. मात्र, त्याचवेळी देणाऱ्याची जितकी रक्कम देण्याची इच्छा असेल, तितकीच ते स्वीकारत आहे. दिवसभरात त्यांच्याकडून अनेकांनी मूर्ती नेली आहे.
पाळधीच्या दीपक माळी या तरुणाने अशा प्रकारचा उपक्रम या आधी मुंबईत पाहिला होता. तसेच पर्यावरण जागृतीसाठी अनेकजण शाडू मातीची मूर्ती घेण्याची इच्छा असूनही किंमत जास्त असल्याने त्यांना ती घेता येत नसल्याचेही पाहिले होते. त्यामुळे त्याने विशाल शिंपी, समाधान भोई, दीपक चौधरी, महेंद्र कोळी या मित्रांच्या सहकार्याने शहरातील गोविंदा रिक्षा चौकात स्टॉल लावला आणि मूर्ती नेताना देणाऱ्याने आपल्या इच्छेने देणगी द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
दीपक याने यावर्षी ५५ मूर्ती आणल्या होत्या. पुढच्या वर्षी आणखी मूर्ती आणणार असल्याचे त्याने सांगितले. या मूर्तींची किंमत ही मिळणाऱ्या देणगीपेक्षा जास्त असते. मात्र, हे काम भक्तिभावाने करत असून किती पैसे मिळतील, याचा विचारदेखील करत नसल्याचे दीपक याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
कोट
शाडू मातीच्या मूर्तीमुळे पर्यावरणाचे संवर्धन होत असते. मात्र अनेकदा ही मूर्ती महाग असल्यामुळे नाईलाजास्तव भाविक प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती खरेदी करीत असतात. हे काम करीत असताना नफा किंवा तोटा याचा विचार न करता केवळ पर्यावरणाचे संवर्धन होईल हा हेतू समोर ठेवला.
दीपक माळी, शाडू माती गणेश मूर्ती विक्रेता.