जळगाव : खाल्लेल्या पपईची साल घराच्या बाहेर फेकायला येणे प्रमिला बालकिसन सोमानी (वय ७२) या वृद्धेला तब्बल एक लाख रुपयात महाग पडले आहे. पपईची साल फेकताच दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची मंगलपोत तोडून नेल्याची घटना सोमवारी सायंकाळी चैतन्य नगरात घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
चैतन्य नगरातील भूपाली अपार्टमेंट येथे प्रमिला बालकिसन सोमानी या कुटुंबासह वास्तव्यास आहे. सोमवारी सायंकाळी घरात सर्वांनी पपई खाल्ली. त्यानंतर त्याच्या साली बाहेर फेकण्यासाठी त्या इमारतीतून खाली उतरल्या. इमारतीपासून थोड्या अंतरावर रस्त्याच्या कडेला पपईच्या साली फेकून झाल्यावर परत त्या इमारतीजवळ आल्या. गेटमधून इमारतीत प्रवेश करणार तितक्यात काही कळण्याच्या आत दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची एक लाख रुपये किमतीची सोन्याची मंगलपोत तोडून नेली. या प्रकारामुळे घाबरलेल्या प्रमिला यांनी आरडाओरड केली; मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. चोरटे भरधाव वेगाने निघून गेले. या घटनेनंतर कुटुंबीयांना जिल्हा पेठ पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही मिळते का? याचा रात्री दहा वाजेपर्यंत शोध घेतला; मात्र काहीच मिळाले नाही. त्यानंतर सोमाणी यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे करीत आहेत.