जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एमआरआयची सुविधा सुरू करण्यासंदर्भात गेल्या वर्षी हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, ही यंत्रणा सुरूच झाली नाही. त्यातच सीटीस्कॅन मशीनही गेल्या दोन वर्षांपासून बंदच असून आता हे मशीन दुरुस्त करण्याची कार्यवाही जवळपास पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व जिल्हा रुग्णालयाचा तीन वर्षांचा करार नूतनीकरणासाठी पाठविण्यात आला असून सद्य:स्थितीत या दोनही यंत्रणा एकाच ठिकाणी सुरू आहेत. दरम्यान, एप्रिल महिन्यात हे संपूर्ण रुग्णालय कोरोना रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यात मध्यंतरीच्या काळात अनेक अत्याधुनिक मशिनरींची भर पडली आहे. यात १०० पेक्षा अधिक व्हेंटिलेटर्सचा समावेश असून आधुनिक मॉनिटर्स, नवीन बेड, एक्सरे मशीन यांचा समावेश आहे. कोरोनाकाळात या मशिनरींमुळे मोठा फायदा झाल्याची स्थिती आहे. वाढलेला मृत्युदर नियंत्रणात आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिल्याचे डॉक्टर सांगतात.
डिसेंबर महिन्यातील ओपीडी
१५०
जानेवारीतील ओपीडी
४५०
महिनाभरापूर्वीच सुरू झाली सेवा
कोविड रुग्णालयात रुग्णसंख्या घटल्यानंतर डिसेंबरपासून जीएमसीत नॉन कोविड यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. त्यात हळूहळू टप्प्याटप्प्याने सर्व सेवा सुरळीत सुरू करण्यात येत आहे. त्यात सीटीस्कॅन मशीन दुरुस्त करण्यासंदर्भात संबंधित कंपनीशी संपर्क साधून त्यांना बिलही अदा करण्यात आले असून कंपनीचा माणूस येऊन लवकरच हे मशीन दुरुस्त करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
कोट
सीटीस्कॅन मशीन नादुरुस्त असल्याने संबंधित कंपनीला कळविण्यात आले आहे. त्यांनी सांगितल्यानुसार बिलही अदा करण्यात आले असून लवकरच कंपनीचा माणूस येऊन हे मशीन दुरुस्त करणार आहे. लवकरच ही सेवा सुरू होणार आहे. - डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता
कोरोनाकाळात दुर्लक्ष
कोरोनाकाळात सीटीस्कॅन करणे, हे कोरोनाचा संसर्ग किती, याची माहिती होण्यासाठी उत्तम निदान म्हणून केले जात होते. मात्र, कोविड रुग्णालयातील ही यंत्रणा बंद असल्याने केवळ एक्सरेवरच हे निदान होत होते. शिवाय, खासगी याचे दर अडीच हजारांपर्यंत असल्याने अनेक रुग्णांना हा भुर्दंडही सहन करावा लागत होता. कोविडच्या खासगी रुग्णालयात तर प्रत्येकाला सीटीस्कॅन करणे बंधनकारकच करण्यात आले होते. रुग्णालय कोविड असल्यामुळे हे मशीन दुरुस्त करण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. आता नॉन कोविड सुविधा सुरू झाल्यानंतर मशीन दुरुस्त करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.