जळगाव : घरातील आर्थिक परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडून नोकरी करावी लागते, तर काही छोटा-मोठा व्यवसाय सुरू करतात. अशा विद्यार्थ्यांना व्यवसाय, नोकरीसोबतच शिक्षणही पूर्ण करता यावे, या उद्देशातून मूळजी जेठा महाविद्यालय येथे रात्रकालीन महाविद्यालय सुरू करण्यात आले असल्याची माहिती कान्ह कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार भारंबे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी मू़जे़ महाविद्यालयाचे प्राचार्य स. ना. भारंबे यांची उपस्थिती होती.
या रात्रकालीन महाविद्यालयाला कान्ह कला, वाणिज्य महाविद्यालय असे नाव देण्यात आले असून नियमित वर्ग भरणार आहेत. सद्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षण दिले जाईल. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून जे विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असतील, ते या रात्रकालीन महाविद्यालयात कला शाखा व वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊ शकतील. हे महाविद्यालय विद्यापीठाशी संलग्न असणार आहे. चालू महिन्यापासून महाविद्यालयास सुरुवात होणार असून, विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.