दापोरा ता. जळगाव : सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे दापोरा येथील शेतकऱ्यांचा मका जमीनदोस्त झाला आहे. शेतक-याला सर्वच स्तरांवर फटका बसत असल्याची परिस्थिती येऊन ठेपली आहे. अगोदरच कोरोनामुळे परिसरातील आपला केळीचा माल कवडीमोल भावात विकावा लागला आणि आताही मोठ्या प्रमाणात करपा रोगाच्या प्रादुर्भावाचा सामना करावा लागत असून प्रत्येक बागेत केळीचे घड पिकत असल्याची परिस्थिती आहे.
गेल्या आठवडाभरात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे दापोरा येथील रेल्वेलाइनजवळील पद्माकर तांदळे, सुपडू पाटील, गोकुळ तांदळे, पांडुरंग काळे या शेतकऱ्यांचा मका जमीनदोस्त झाला आहे. यामुळे हातातोंडाशी आलेला घास गेला आहे. अगोदर मूग, उडिदाचेदेखील काहीच उत्पन्न आले नाही आणि त्यात आताही मका जमीनदोस्त झाल्याने काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे.
फोटो: दापोरा येथील पद्माकर सुरेश तांदळे यांच्या शेतातील जमीनदोस्त झालेला मका.