लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मंगळवार आणि बुधवारी झालेल्या पावसाने साडेआठ हजार हेक्टरवरील शेतजमिनीचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्यात अतिवृष्टी झालेल्या चाळीसगाव आणि जामनेर तालुक्यात सर्वाधिक नुकसान आहे. एकट्या चाळीसगाव तालुक्यात ५ हजार ५०१ हेक्टरचे तर जामनेरला २ हजार ६७३ हेक्टरचे नुकसान झाले आहे.
कृषी विभागाकडे असलेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात ७ आणि ८ सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाली. त्यात एकूण १३२ गावांमधील १२ हजार ९६६ शेतकऱ्यांना या अति पावसाचा फटका बसला. यात उडिदाचे ५२ हेक्टर, मूग २१ हेक्टर, बाजरी २२.४० हेक्टर, कापूस ५ हजार ९९३.८५ हेक्टर, मका १६९९ हेक्टर, पपई ७.५० हेक्टर, केळी ३७ हेक्टर, भाजीपाला १६३ हेक्टर आणि इतर ४१८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यासोबतच ३० हेक्टरवरील फळपिकांचेदेखील नुकसान झाले आहे.
कापूस आणि मक्याला मोठा फटका
जिल्ह्यात कापसाचे जे नुकसान झाले आहे. त्यात एकट्या चाळीसगाव तालुक्यात ४ हजार ५२ हेक्टरवरील कापसाचे नुकसान झाले आहे. तसेच जामनेर तालुक्यातदेखील १ हजार ७४६ हेक्टरवरील कापूस वाया जाण्याची भीती आहे. या दोन तालुक्यात जिल्ह्यात अतिवृष्टीने सर्वात जास्त नुकसान केले आहे.
तालुका, बाधित गावे, शेतकरी एकूण नुकसान (हेक्टर)
जळगाव २३ ३१४ २९२
चाळीसगाव ६९ ९५८२ ५५०१
पाचोरा २ २५ १०
जामनेर ५२ ३२३५ २६७६.६०
चोपडा ९ १२४ ४९.६५
पारोळा ३ २५ २०