लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरटीई शैक्षणिक वर्षासाठीच्या २५ टक्के जागांसाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेची लॉटरी नुकतीच जाहीर झाली. मात्र, लॉकडाऊनमुळे कागदपत्रे पडताळणी करू नये, असा आदेश असल्याने प्रवेशप्रक्रिया लांबणीवर पडली आहे. अजूनही ही प्रक्रिया प्रारंभ न झाल्यामुळे पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.
आरटीई प्रवेशाच्या आशेवर असणारे पालक यंदा उशिरा सुरू होत असलेल्या प्रवेशप्रक्रियेमुळे हवालदिल झाले आहेत. मागील वर्षी सुद्धादेखील लॉटरी जाहीर झाल्यानंतर लॉकडाऊनमुळे कागदपत्र पडताळणी करण्यास विलंब झाला होता. लॉकडाऊन वाढल्याने कागदपत्र पडताळणीचा अधिकार शाळांकडे देण्यात आला. मात्र, शाळांनी कागदपत्र पडताळणी सुरुवातीला विरोध दर्शविला. त्यामुळे प्रवेशप्रक्रियेस विलंब लागला. त्याचीच पुनरावृत्ती यंदा होत आहे. १५ एप्रिल रोजी पालकांना एसएमएस पाठविण्यात आले आहे. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. प्रक्रिया थांबून २० दिवस उलटले आहे. मात्र, अद्याप कुठल्याही सूचना देण्यात आलेल्या नाही. लॉकडाऊन संपल्यावर आवश्यक सूचना केल्या जातील, असे संकेतस्थळावर दर्शविण्यात आले आहे.
२ हजार ६९५ विद्यार्थ्यांना लॉटरी
७ एप्रिल रोजी सोडत काढण्यात आली होती. नंतर १५ एप्रिलला प्रथम यादी जाहीर करण्यात आली. त्यात २ हजार ६९५ विद्यार्थ्यांना लॉटरी लागली. पण, अद्याप या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश निश्चित करता आलेले नाही. यंदा २९६ शाळांमधील ३ हजार ६५ जागांसाठी ही प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. ही प्रक्रिया लांबत राहिली, तर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना कधी प्रवेश मिळणार? असा सवाल आता पालकांकडून उपस्थित केला जात आहे.