भुसावळ - स्वातंत्र्याची लढाई ही सर्व ओबीसी बांधवांनी लढल्याने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि आज ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपविण्याचा घाट सुरू आहे. हे कदापि आम्ही होऊ देणार नाही, असे परखड मत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांच्यासह भुसावळ येथील सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडले.
भुसावळ येथे माळी भवनमध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून 'ओबीसी राजकीय आरक्षण पे चर्चा' या बैठकीचे आयोजन शनिवारी १७ रोजी दुपारी करण्यात आले होते.
या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून बाळासाहेब कर्डक यांची उपस्थिती होती, तसेच धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अशोक नाळे, निरीक्षक आशिष शेलार, सर्वोच्च न्यायालयाचे वकील ॲड. प्रतीक कर्डक, महात्मा फुले समता परिषदेचे जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष वसंत पाटील, युवक जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, राष्ट्रवादीचे प्रा. डॉ.सुनील नेवे, शिवसेनेचे दीपक धांडे, शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे, भाजपचे शिशिर जावळे, झेंडूजी महाराज, सामाजिक संघटनेचे अध्यक्ष दिनेश भंगाळे उपस्थित होते. प्रास्ताविक महात्मा फुले समता परिषदचे तालुकाध्यक्ष संतोष माळी यांनी केले.
राष्ट्रवादीचे प्रा.डॉ. सुनील नेवे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी उदासीनता झटकून एकत्र येऊन ओबीसी राजकीय आरक्षणात सहकार्य केले पाहिजे. भाजपचे शिशिर जावळे यांनी सांगितले की, ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कासाठी सर्व पक्ष, सामाजिक संघटना यांनी मतभेद विसरून एकत्र यावे.
शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपक धांडे यांनी सांगितले की, ओबीसी समाजाचं राजकीय अस्तित्व धोक्यात आणू पाहणाऱ्या प्रवृत्तींना शिवसेना स्टाइल उत्तर देऊन आरक्षण मिळणारच.
ओबीसीचे राजकीय नेतृत्व संपविणारे कितीही विद्वान असो.. आमच्या अंगावर आल्यास शिंगावर घेऊ.. असा इशाराही संत झेंडुजी महाराज बेळीकर लेवा पाटीदार युवक मंडळ भुसावळचे अध्यक्ष दिनेश भंगाळे यांनी दिला.
यावेळी ॲड. सागर सरोदे, वसंतराव कोलते, एसटी महामंडळ युनियन नेते धर्मराज देवकर, किशोर पाटील, सचिन बऱ्हाटे, गिरीश पाटील, सागर वाघोदे, संजय बऱ्हाटे, महालक्ष्मी ग्रुप भुसावळचे सर्व पदाधिकारी तसेच कैलास बंड, माळी महासंघाचे भुसावळ तालुका अध्यक्ष विजय माळी, वरणगाव शहर अध्यक्ष सचिन माळी, गजानन माळी, सुधाकर माळी आदी उपस्थित होते. आभार प्राचार्य धीरज पाटील यांनी मानले.