(सेंट्रल डेस्कसाठी)
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तालुक्यातील ममुराबाद गावाच्या शिवारात बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास एक बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. परिसरातील गावांमधील नागरिकांनी बिबट्याचा मृतदेह पाहण्यासाठी गर्दी केली होती. महिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पंचनामा करण्यात आला. दरम्यान, या बिबट्याचा मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. बिबट्याची हत्या केल्याचा संशय वन्यप्रेमींनी व्यक्त केला आहे.
ममुराबाद गावापासून काही अंतरावर नांद्रा फाटा येथे रस्त्याच्या कडेला बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. सकाळी ९ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे शेतात जाणाऱ्या काही शेतमजुरांना बिबट्या निपचित अवस्थेत पडलेला दिसला. त्यामुळे ते भीतीने पळून गेले. या घटनेची माहिती ममुराबाद गावात पसरली. त्यानंतर या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता बिबट्या मृतावस्थेत असल्याचे स्पष्ट झाले. या ठिकाणी सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी भेट दिली. यासह सहायक वनसंरक्षक सी. आर. कांबळे, वनक्षेत्रपाल आर. जे. राणे, अशोक पाटील यांच्यासह तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे आदींनी पाहणी करून प्राथमिक तपासणी केली. यासह वन्यजीव संरक्षण संस्थेचे बाळकृष्ण देवरे, राहुल सोनवणे, दिनेश सपकाळे, प्रसाद सोनवणे, रितेश भोई यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
घटनास्थळी बघ्यांची उसळली गर्दी
बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. गर्दीमुळे पंचनामा करताना अडचणी येत असल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना गर्दी पांगवण्यासाठी प्रयत्न करावे लागले. काही तरुण या ठिकाणी हुल्लडबाजी करत होते.
बिबट्याला मारून शिवारात फेकल्याचा संशय
या बिबट्यावर विषप्रयोग करून त्याला ठार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतावस्थेत असलेल्या बिबट्याला या ठिकाणी आणून टाकल्याची शक्यता आहे. कारण ममुराबाद शिवारात आजपर्यंत बिबट्या आढळून आल्याची एकही घटना घडलेली नाही. अशा परिस्थितीत थेट बिबट्या मृतावस्थेत आढळून येणे संशयास्पद असल्याचे वन्यप्रेमींचे म्हणणे आहे. तसेच वनकर्मचारी व वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी पाहणी केली असता, बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले नाही. तसेच ओेढून आणण्याचेही कोणतेही पुरावे या भागात आढळून आलेले नाहीत. त्यामुळे दुसऱ्या भागात हा बिबट्या मृत पावला असून, त्या ठिकाणाहून या भागात बिबट्या आणून फेकल्याची चर्चा आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्यात आली पाहिजे, अशी मागणी वन्यप्रेमींनी केली आहे.