या मार्गाचे दोन वर्षांपूर्वी दुपदरीकरण व डांबरीकरण करण्यात आले. कोळगाव ते शिंदीदरम्यान भारी व काळी मातीची जमीन आहे. हे काम झाल्यानंतरही रस्ता पावसाळ्यात खचतो. यामुळे डांबरीकरण निघते. ठिकठिकाणी रस्ता उंच, खोल होतो. यामुळे चारचाकी वाहने हेलकावे खात चालतात. रस्त्याच्या मधोमध एकसारखे खड्डे पडत ते रस्ता विभाजकाप्रमाणे भासत आहेत. ते चुकविताना समोरासमोरील वाहनांचे अपघात होत आहेत.
या मार्गादरम्यान बागायती जमीन असल्याने ठिकठिकाणी रस्त्यामधून आडव्या जलवाहिन्या शेतकऱ्यांनी खोदल्या आहेत. येथील माती खचल्याने तेथे नाल्या पडल्या आहेत. दिवसा वेगाने धावणाऱ्या वाहनांना व रात्री या पडलेल्या नाल्यांचा अंदाज येत नसल्याने वाहनधारक फेकले जाऊन किरकोळ अपघात घडत आहे. संपूर्ण रस्ता व्यापलेल्या या नाल्यांचा अडथळा पार करताना दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला चाचपडतात. यात ते साइडपट्ट्यांना फेकले जातात.
या जलवाहिन्यांच्या पडलेल्या नाल्या खडी व डांबर टाकून बुजविणे आवश्यक आहे.
शिंदी ते कोळगावदरम्यान या रस्त्याने तीन-चार फूट काळी माती खोदून ती बाहेर काढण्याची गरज आहे. त्या ठिकाणी मुरूम आदी पुन्हा भराव करून खडीकरण, डांबरीकरण झाले, तरच ही डोकेदुखी कायमची दूर होणार आहे, अन्यथा दर पावसाळ्यात ‘ये रे माझ्या मागल्या’प्रमाणे खड्डे होत राहणार आहेत.
शिंदी ते कोळगाव रस्त्यात मधोमध पडलेला खड्डा तर रस्त्याला आडव्या गेलेल्या जलवाहिन्यांच्या ठिकाणी या अशा नाल्या पडल्या आहेत.