लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : नगदी फळपिकांची आयात कमी करून देशांतर्गत उत्पादन वाढवून निर्यातीला चालना देण्यासाठी, केंद्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या फलोत्पादन क्षेत्र विकास योजना म्हणजेच व्हर्टिकल्चर क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्रॅम या योजनेत जळगाव जिल्ह्यातील केळ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. ३१ मे रोजी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी या योजनेचे उद्घाटन केले. मात्र, या योजनेत जळगाव जिल्ह्यातील केळ्यांचा समावेश न करता, आंध्रप्रदेश व तामिळनाडू या राज्यांमधील दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा मोठा फटका असून, जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी तसेच व्यापारी या निर्णयामुळे निराश झाले आहेत. या योजनेमध्ये आंध्र प्रदेशातील अनंतपूर, तर तामिळनाडूमधील थेनी या जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही जिल्ह्यांच्या तोडीस तोड उत्पादन जळगाव जिल्ह्यातदेखील केले जाते. तसेच जळगाव जिल्ह्यातील केळ्यांची निर्यात अरब राष्ट्रापासून ते युरोपापर्यंत केली जात असताना केंद्रीय कृषी विभागाने जिल्ह्यातील केळ्यांकडे दुर्लक्ष केले आहे.
जळगाव जिल्हा केळ्यांचा मोठा पुरवठादार
जळगाव जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्रावर केळ्यांची लागवड होते. विशेष म्हणजे केवळ रावेर, चोपडा, यावल व जळगाव जिल्ह्यातील गिरणा काठच्या भागात केळ्यांची लागवड होत असते. जळगाव जिल्ह्यातील केळी संपूर्ण भारतात प्रसिद्ध असून, जम्मू - काश्मीरपासून ते सिक्कीमपर्यंत, इराणपासून ते कुवेतपर्यंत केळ्यांची निर्यातही केली जात असते. मात्र, केंद्र शासनाने व्हर्टिकल्चर क्लस्टर डेव्हलपिंग प्रोग्राममध्ये जळगाव जिल्ह्याचा समावेश न केल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
काय आहे व्हर्टिकल्चर क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम ?
केंद्र शासनाच्या सप्तवर्षपूर्तीनिमित्त केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी वेगवेगळ्या फळपिकांसाठी देशात ५३ फलोत्पादन क्षेत्र शोधले आहेत. त्यात केळ्यांसाठी जळगाव जिल्ह्याची निवड होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, यामध्ये जळगाव जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला नाही. या क्लस्टर विकास कार्यक्रमामुळे कृषी क्षेत्रात सुमारे दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे. दहा लाख शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे. नगदी फळपिकांची आयात कमी करणे आणि देशांतर्गत उत्पादन वाढवून निर्यातीला प्रोत्साहन देणे, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
कोट..
जळगाव जिल्ह्यातील केळी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. अनेक देशांकडून जिल्ह्यातील केळ्यांना मागणी आहे. तसेच ही मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ही बाब विचारात घेऊन फलोत्पादन क्षेत्र विकास योजनेत केळी पिकासाठी जळगाव जिल्ह्याचा समावेश केला जावा, यासाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. पुढील टप्प्यात जळगाव जिल्ह्याचा समावेश करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.
- रक्षा खडसे, खासदार
केळींची होत असलेली लागवड
अनंतपूर - १ लाख १२ हजार हेक्टर
जळगाव - १ लाख २ हजार हेक्टर
थेनी - ८८ हजार हेक्टर