लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आधीच लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे हाल सुरू असतानाच रासायनिक खतांच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकऱ्यांसमोर आता नवीन संकट उभे राहिले आहे. हंगाम सुरू होण्याआधीच रासायनिक खतांच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. खत कंपन्यांकडून दरवाढ होणार नाही, असे सांगूनही भाववाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यात गेल्या काही वर्षांमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत आहे. सोयाबीन पिकासाठी आवश्यक असलेल्या डीएपी खताच्या भावात तर ५० टक्के भाववाढ झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या खरीप हंगामात पाऊस चांगला होऊनही उत्पन्नात घट आल्याने जेमतेम उत्पन्नावरच शेतकऱ्यांना उदरनिर्वाह करावा लागला. त्यात कोरोना काळात शेती उत्पादनात आलेल्या मालाला भाव मिळत नसल्याने त्यातच शेतकऱ्यांना समाधान मानावे लागले. खरीप हंगामासाठी लागणारे बी-बियाणे व खतांच्या खरेदीसाठी शेतकरी कर्जावर अवलंबून असतो. गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे सावट असल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना पीककर्जासाठी खासगी बँका, पीक सोसायट्या यांच्याकडून कर्ज घेण्यासाठीही शेतकऱ्यांचा खटाटोप सुरू आहे.
युरियाची किंमत स्थिर असल्याने मात्र दिलासा
एकीकडे रासायनिक खतांच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने शेतकरी संतप्त असले तरी युरियाच्या भावात मात्र कोणतीही वाढ न झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान, गेल्यावर्षीप्रमाणे युरियाची साठवणूक केल्यास याबाबत गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.
कापूस लागवडीसाठी मध्यप्रदेशातून बियाणे
कृषी विभागाने हंगामपूर्व कापूस लागवडीसाठी १ जूननंतरच बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये हंगामपूर्व कापूस लागवडीला सुरुवात झाली असून, जिल्ह्यात बियाणे उपलब्ध होत नसल्याने आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मध्यप्रदेश व गुजरात मधून बियाणे आणण्यास सुरुवात केली असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. बाहेरून आणल्या जाणाऱ्या बियाणांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ असण्याची शक्यता असते. यामुळे कापसाच्या गुणवत्तेवर देखील मोठा परिणाम होत असतो, इतर राज्यांमधून बियाणे आणू नये व तसे आढळल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.
कंपनी - आधीचे दर - नवे दर
डीएपी
इफको १२०० - १९००
कोरोमंडल १२५० -१४५०
स्मार्टकेम १२५० - २१००
जीएसएफसी १२००- १९००
आरसीएफ १३४० -
कृभको १२५०- १९००
इंडियन पोटॅश१२२५- १९००
झुआरी/प्रदीप फॉस्फेट १२५५ - १९००
एमओपी
कोरोमंडल ९५० - ८५०
स्मार्टकेम ९५० -
जीएसएफसी ९५० - ८७५
आरसीएफ ९७० - ८५०
कृभको ८७५ -
इंडियन पोटॅश ९५० - १०००
झुआरी/प्रदीप फॉस्फेट ९४९ - १०००