सुनील पाटील
जळगाव : सावधान ! अनोळखी व्यक्तीच्या हातात मोबाईल दिला तर काही क्षणातच तुमच्या बँक खात्यातील रक्कम गायब होऊ शकते. सायबर गुन्हेगारीचा हा प्रकार असून, कमी श्रमात अधिक पैसे कमविण्यासाठी गुन्हेगारांनी ही नवी पद्धत शोधून काढली आहे. त्यामुळे नागरिकांनी काहीही कारण सांगितले तरी कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या हाती मोबाईल देऊ नका, असे आवाहन सायबर पोलिसांकडून केले जात आहे.
झटपट पैसा कमविण्यासाठी गुन्हेगार नागरिकांना गंडा घालत आहेत. ऑनलाइनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक होत आहे. अनोळखी व्यक्तीने फोन करण्याच्या नावावर आपल्याकडे मोबाईल मागितला तर देऊ नका; अन्यथा मोबाईलवर बोलण्याचे सांगून आपल्या मोबाईलवर ओटीपी मागवून तो ओटीपी नंबर घेतल्यास ते लोक आपली नजर चुकवून क्षणार्धात आपल्या खात्यातील सर्व रक्कम आपल्या खात्यात वळती करून घेतील. आपण सार्वजनिक ठिकाणी जात असाल तर आपला मोबाईल सांभाळून ठेवा; अन्यथा आपल्या खात्यातील लाखो रुपये चोरून नेण्यासाठी चोरांना एक मिनिट पुरेसा आहे. आपल्या खात्याशी आपला मोबाईल क्रमांक जोडलेला आहे. खाते क्रमांकाशी जोडलेल्या नंबरवर ओटीपी आल्यास तो ओटीपी नंबर घेऊन लोक आपल्या मोबाईलचा आधार न घेताच लाखो रुपये आपल्या खात्यात वळते करून घेतील.
ओटीपी मिळविण्यासाठी अशी केली जाऊ शकते फसवणूक
१) कॉल करण्यासाठी मोबाईल घेऊन
अनोळखी व्यक्तीने कॉल करण्यासाठी आपल्याकडे मोबाईल मागितल्यास त्याला आपला मोबाईल देऊ नका; अन्यथा आपली फसवणूक होऊ शकते.
२) वेगळी लिंक पाठवून
नोकरी किंवा वेगवेगळ्या कारणांसाठी आपल्या मोबाईलवर ते वेगळी लिंक पाठवतील. त्या लिंकवर क्लिक केल्यास आपल्या खात्यातील रक्कम वळती करू शकतात.
३) लॉटरी लागली आहे असे सांगून
तुम्हाला लॉटरी लागली आहे असे सांगून कधी मेसेज, तर कधी ई-मेल पाठवून लोकांना आपल्या जाळ्यात अडकवितात. अलीकडे या घटना वाढलेल्या आहेत.
४) केवायसीच्या नावावर लबाडणूक
अमूक बँकेतून बोलतोय, आपल्या खात्याला केवायसी करायचे आहे. ओटीपी नंबर सांगा, असे खोटे बोलून लोकांना लुटले जाते.
ही घ्या काळजी-
१) कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला मोबाईल देऊ नका, कॉल आल्यास त्यावर माहिती देऊ नका, ओटीपी क्रमांक सांगू नका, फसव्या कॉलपासून सावध राहा. आपल्याला ई-मेल किंवा मोबाईलवर संदेश आल्यास डीलिट करा, प्रतिसाद देऊ नका.
२) आपल्या बँक खात्याची माहिती कुणालाही देऊ नका. कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. आलेली अनोळखी लिंक ओपन करू नका. संभाषण झाल्यास आपल्या संदर्भातली कुठलीही माहिती समोरच्या व्यक्तीला देऊ नका; अन्यथा आपली फसवणूक होईल.
३) लॉटरी लागल्याचे आमिष देऊन अनेक महिला, पुरुषांची फसवणूक केली जाते. लोकांना महागड्या वस्तू लॉटरीत लागल्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली जाते. यापासून सावध राहण्याची गरज आहे.
कोट..
माझ्याकडे मोबाईल नाही. एक अर्जंट कॉल करायचा आहे, असे सांगून अनोळखी व्यक्ती आपला मोबाईल घेऊन काही क्षणातच लिंक किंवा ओटीपी चोरी करू शकतो. त्यातून बँक खात्यातील रक्कम गायब होण्याचा धोका असतो. आपली फसवणूक होऊ नये म्हणून दक्ष राहावे. शक्यतो मोबाईल वापरताना आपण स्वत:देखील काळजी घेणे गरजेचे आहे.
- बळिराम हिरे, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे