खेडीढोक, ता. पारोळा : येथे संततधार पावसामुळे मातीच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड होऊन नुकसान झाले आहे. महसूल विभागाकडून नुकसानाचे पंचनामे करण्यात आले असून, नुकसानग्रस्तांना त्वरित मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.
गेल्या आठवडाभरात संततधार पावसामुळे गावातील मातीच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड होऊन नुकसान झाले आहे. बऱ्याच दिवसांनंतर पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला आहे; मात्र संततधार पावसामुळे येथील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. पडझड झालेल्या घरांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही; मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील रवींद्र महाराज पाटील, धरम भिवसन पाटील, प्रदीप पाटील, तुळशिराम मोहन पाटील, लताबाई, बेबाबाई पाटील, सुरेश पाटील, आनंदा गणसिंग पाटील यांच्या घरांचे पावसामुळे नुकसान झाले आहे.
येथील तलाठी राकेश भगवान काळमेघ व सुनील पाटील यांनी घटनास्थळाचे पंचनामे केले असून, नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, पावसामुळे धाब्याची घरे पडत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.