लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. त्यात हॉटेल व्यावसायीक व कर्मचाऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. अनलॉकमध्येही हॉटेलला पूर्णवेळ परवानगी नसल्याने अडचणीत अधिकच भर पडली होती. त्यात आता दहा पर्यंत परवानगी मिळाली आहे. दुसरीकडे लसींच्या तुटवड्याचा हॉटेल कर्मचाऱ्यांच्या लसीकरणावरही परिणाम होत आहे. शहरातील हॉटेल्समधील ५५ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, आता लस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने काही कर्मचारी वंचित राहत आहेत. अशा स्थितीत त्यांना प्राधान्याने लस देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी समोर येत आहे.
शहरात १७० हॉटेल्स आहेत. त्यातील काही बंद आहेत, अनलॉकनंतर आता १५ ऑगस्टपासून हॉटेल दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याबाबत आदेश काढण्यात आले आहे. कोविडच्या काळात हॉटेल व्यवसाय बंदच होता. दरम्यान, कर्मचाऱ्यांमध्येही ५० ते ५५ टक्के कर्मचारी हे बाहेरील राज्यातील आहे. शहरातील लसीकरणाची गती बघता आठवड्यातून तीन ते चार दिवस केंद्र बंदच राहत आहे. सुरू असलेल्या केंद्रांवर कुपन घेऊन नंबर लावून लस घ्यावी लागत आहे. अशा स्थितीत कामाच्या वेळा जमत नसल्याने, लस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने हॉटेल कर्मचारी लसीकरणापासून दूर राहत असल्याचे चित्र आहे.
शहरातील हॉटेल्स १७०
सध्या सुरू असलेल्या हॉटेल्स १५०
हॉटेलमधील कर्मचारी १५००
आमचे लसीकरण, ग्राहकांची पूर्ण काळजी
हॉटेल १
आकाशवाणी चौकातील एका हॉटेलमध्ये चौकशी केली असता दोन कर्मचाऱ्यांनी लस घेतल्याचे सांगितले. ग्राहकांच्याबाबतीत काय काळजी घेतली जाते याचीही त्यांनी माहिती दिली.
हॉटेल २
भास्कर मार्केटमधील काही कर्मचाऱ्यांना लसीकरणाबाबत विचारले असता. लसीकरण झाल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय हॉटेलमध्ये कोविडचे सर्व नियम पाळूनच हॉटेल सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
लस उपलब्ध नसणे, ती वेळेवर न मिळणे या बाबींमुळे शहरातील काही हॉटेल कर्मचारी लसींपासून वंचित आहेत. यासाठी प्रशासनाने स्वतंत्र व्यवस्था करणे अपेक्षित आहे. सर्वच हॉटेल चालक कोविडच्या नियमांचे पालन करूनच, ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व नियम पाळूनच व्यवसाय करीत आहेत. कोविडच्या काळात व्यावसायिकांवर मोठे संकट कोसळले आहे. - लेखराज उपाध्याय, अध्यक्ष जळगाव हॉटेल ॲण्ड टुरिझम असोसिएशन