लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : खरीप हंगाम जसजसा जवळ येत आहे, तसतशी शेतकऱ्यांची शेती कामाची लगबग वाढत आहे. यामुळे घरात असलेले धान्य व इतर शेतीमाल विक्री करण्यासाठी धावपळ होत आहे. त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधादरम्यान धान्याच्या खरेदी-विक्रीवरही परिणाम झाला आहे. दुकानांच्या वेळा मर्यादित असल्याने, या काळात धान्यविक्री पूर्णपणे होत नसल्याने, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्याची आवक १० ते १५ टक्क्यांवर आली आहे. त्यात धान्याचे भावही कमी होत आहे.
गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढल्यापासून त्याचा मोठा परिणाम अजूनही जाणवत आहे. गेल्या वर्षी कडक लॉकडाऊनमुळे विविध क्षेत्रांना चांगलीच झळ बसली. सप्टेंबर महिन्यानंतर स्थिती सुधारत असताना, फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला व व्यवसायांवर परिणाम होणे सुरू झाले. कोरोना नियंत्रणासाठी जनता कर्फ्यू, तीन दिवस कडक निर्बंध असे नियम घालून देण्यात आले. तरीही कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने अखेर ‘ब्रेक द चेन’ लागू केले. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी असल्याने, दिवसभर काही ना काही खरेदीच्या नावाने नागरिक विनाकारण बाहेर फिरत असल्याची स्थिती होती. त्यामुळे अखेर अत्यावश्यक सेवेतील दुकानांच्या वेळा सकाळी सात ते ११ या वेळेतच उघडी ठेवण्याची अट घालण्यात आली. यामध्ये बाजार समितीमध्येही याच वेळेत व्यवहार होत आहेत.
उशिरा आल्यास माल न्यावा लागतो परत
बाजार समितीतील व्यवहारांवरही वेळेच्या मर्यादा आल्याने ११ वाजेनंतर धान्य खरेदीही केली जात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपला माल सकाळी ११ वाजेनंतर आणल्यास त्यांना तो परत न्यावा लागत आहे. त्यामुळे सकाळी चार तासांत जेवढा माल खरेदी होईल, तेवढाच माल बाजार समितीमध्ये उपलब्ध राहत आहे. परिणामी, शेतकरीही सकाळी उशीर झाल्यास माल आणत नसून दुसऱ्या दिवशी तो आणतात. दररोज अशा प्रकारे शेतकऱ्यांची संख्या कमी होत असल्याने आवकही घटत आहे.
शेतीकामासाठी पैशांची जमवाजमव
खरीप हंगाम तोंडावर येत असल्याने शेती कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे घरात असलेला शेती माल विकणेही आवश्यक असल्याने, शेतकरी तो विक्रीचा प्रयत्न करीत आहे. त्यात दुकानांच्या वेळा मर्यादित असल्याने माल नेल्यानंतर जो भाव मिळेल, त्या भावात त्याची विक्री करीत आहे.
दररोज होणारी आवक (क्विंटलमध्ये)
धान्य आवक भाव
गहू १५० ते २०० १८०० ते २३००
ज्वारी ६४ १२०० ते २०००
दादर ५० १४०० ते २२००
लाल हरभरा २०० ४८०० ते ४९००
जाड हरभरा १०० ८६०० ते ८७००
शेतकरी काय म्हणतात?
खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतीकामे सुरू झाली आहेत. त्यामुळे आता शेतीत वेळ देण्यासह पैसाही खर्च करावा लागणार आहे. घरात जे धान्य आहे, ते लवकर विक्री करावे लागणार आहे. मात्र, सध्या धान्याचे भाव कमी झाल्याने नुकसान सहन करावे लागणार आहे.
- नामदेव चौधरी, शेतकरी.
घरात असलेला शेती माल विकायचा असला, तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधामुळे दुकानांच्या वेळेवर मर्यादा आल्या आहेत. सकाळी ११ नंतर मालाची खरेदी होत नाही. त्यामुळे सकाळी जो भाव मिळेल, त्या भावात माल विकायचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे.
- स्वप्निल जाधव, शेतकरी.
व्यापारी काय म्हणतात?
सध्या कोरोनामुळे सर्वच व्यवहारांवर परिणाम झाला आहे. त्यात आता दुकानांच्या वेळा कमी असल्याने, कमी वेळेत अधिकाधिक माल खरेदीचे प्रयत्न असतात. त्यात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना माल विकणे गरजेचे असले, तरी वेळेमुळे जास्त माल येत नाहीये.
- सुनील वाणी, व्यापारी.
मालाची आवक कमी झाल्यास त्यांचे भाव वाढतात, तर आवक वाढल्यास भाव कमी होतात. मात्र, सध्या धान्याची आवक कमी असली, तरी त्यांचे भाव कमीच होत आहे. दुकानांच्या वेळा कमी असल्याने माल जास्त खरेदी होत नाही.
- अशोक राठी, व्यापारी.