बोदवड : बोदवड आणि मुक्ताईनगर नगरपंचायतच्या हद्दीत गावठाण त्याचप्रमाणे भोगवटा जागेवर अतिक्रमण करून राहत असलेल्या नागरिकांना दिलासादायक बातमी आहे. या दोन्ही नगरपंचायतच्या हद्दीत असलेल्या अतिक्रमित जागांवर राहणाऱ्या सुमारे ५ हजार नागरिकांना हक्काचे घरकुल मिळणार आहे.
सोमवारी रोजी दुपारी बोदवड येथील शासकीय विश्रामगृहात आमदार चंद्रकांत पाटील, नगरपंचायतचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, शासनाने सर्वेक्षणासाठी नेमलेल्या संस्थेचे केतन बांदेकर यांच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. बोदवड शहरातील नगरपंचायतच्या हद्दीत असलेल्या जागेवर सन २०११ पूर्वी पासून पिढ्यानपिढ्या अतिक्रमण तसेच भोगवटा लावून राहत असलेल्या इंदिरानगर, स्वामी विवेकानंद नगर, तलाव परिसर तसेच शहरात इतर ठिकाणी कच्चे बांधकाम करून राहत असलेल्या सुमारे २,५०० रहिवाशांना प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास या योजनेचा लाभ मालकी हक्क नोंद नसल्यामुळे मिळत नव्हता. त्यामुळे शहरातील अडीच हजारपर्यंत रहिवासी या लाभापासून वंचित राहत होते.
त्यात काहींनी शासकीय नजराणाही भरला होता. परंतु तरीही जागा नावावर होत नव्हती. याबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांनी शासनाच्या नगरविकास त्याचप्रमाणे महसूल विभागाकडे पाठपुरावा करून या जागेवर सर्वेक्षण करण्याची मागणी केली असता त्या मागणीला शासनाकडून मान्यता मिळाळ्याने सदरच्या जागांचे सर्वेक्षण करण्यासाठी समिती नेमली आहे. सदर सर्वेक्षणासाठीचा खर्च जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यात येणार आहे.
त्यासाठी सोमवारपासून बोदवड शहरातील सुमारे अडीच हजार भोगवटादारांना लाभ मिळणार आहे.
२०११ पूर्वीच्या अतिक्रमणधारकांना मिळणार लाभ
सदर जागा २०११ च्या पूर्वी पासून लाभार्थीकडे असावी व तेथे रहिवास असावा, व्यापार वा उद्योग विषयक वापरासाठी नसावी आदी नियम आहेत.
याचरोबर मुक्ताईनगर नगरपंचायतच्या हद्दीतही अडीच हजार असे अतिक्रमणधारक आहेत. त्यांचे सर्वेक्षण करून अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यावर नमुना आठ लागून मालकी हक्क दाखविला जाईल. यामुळे संबंधितांना शासनाच्या घरकुल योजनांचा लाभ घेता येणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली. तर या दोन्ही तालुक्यातील ग्रामीण भागातील जागांसाठी ही आपला पाठपुरावा सुरू असून जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे मागणीही केली असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन महिन्यात होणार बोदवड शहराचे सर्वेक्षण
या जागांचे सर्वेक्षण बोदवड येथे दोन महिन्यात पूर्ण करून अहवाल देण्याचे आश्वासन सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेचे संचालक केतन बांदेकर यांनी दिले.
तर सर्वेक्षणाचा अहवाल आल्यावर या जागांवरील नागरिकांना शासकीय आवास योजना घरकुलाचा लाभ घेता येणार असल्याचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्षांचे पती सईद बागवान, शिवसेनेचे सुनील पाटील, गटनेता देवेंद्र खेवलकर, नगरसेवक सुनील बोरसे, नितीन चव्हाण, सलीम कुरेशी, धनराज गंगातीरे, आनंदा पाटील, डॉ. सुधीर पाटील, गजानन खोडके, शांताराम कोळी, गोपाळ पाटील, सागर पाटील, दीपक माळी, आदी उपस्थित होते.
आमदार चंद्रकांत पाटील यांना शहरातील भोगवटादारांच्या जागांची माहिती देताना सर्वेक्षण करणारे पथक. (छाया : गोपाल व्यास)