लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन करीत असल्याची घोषणा केल्याने अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो, राज्य सरकारच्या निर्णयाला सहकार्य करू, मात्र लॉकडाऊनपेक्षा जनतेचाही विचार करून कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांचा पर्याय शोधला गेला पाहिजे, असा सूर कोरोना आढावा बैठकीत उमटला. दरम्यान, राज्य सरकारने ४ एप्रिल रोजी काढलेल्या लॉकडऊनविषयीच्या आदेशाबाबत लोकप्रतिनिधी संभ्रमात असल्याचे या बैठकीत दिसून आले. मंत्री सांगतात काही व अध्यादेश निघतात वेगळेच, असा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला.
जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेश पाटील, आमदार संजय सावकारे, शिरीष चौधरी, किशोर पाटील, सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील आदी उपस्थित होते.
राज्य सरकारच्या आदेशाविषयी संभ्रम
जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासंदर्भात झालेल्या या बैठकीत राज्य सरकारच्या निर्णयाविषयीदेखील चर्चा झाली. ४ एप्रिल रोजी राज्य सरकारने शनिवार, रविवार संपूर्ण लॉकडाऊन व इतर दिवशी अत्यावश्यक सेवावगळून सर्व दुकाने बंद राहाणार असल्याचे आदेश काढले. या आदेशानुसार शनिवार, रविवार इतर सेवांसह अत्यावश्यक सेवादेखील बंद राहणार का, इतर दिवशी उर्वरित सर्व दुकाने सुरू राहतील की नाही, असा संभ्रम लोकप्रतिनिधीमध्येच असल्याचे दिसून आले. या आदेशात स्पष्टता नसल्याने सरकारदेखील संभ्रमात आहे, मंत्र्यांनी वेगळी घोषणा करायची व अध्यादेश वेगळा काढायचा, असे प्रकार सुरू असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी केला.
लॉकडाऊनला नापसंती
बैठकीत आमदार किशोर पाटील यांनी २१ दिवस लॉकडाऊन करावे, अशी मागणी केली. मात्र इतर बहुतांश लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊनपेक्षा कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना ज्यामध्ये बाधित रुग्ण बाहेर फिरणार नाही, प्रतिबंधित क्षेत्रांची निर्मिती करणे, ग्रामीण भागात पुरेसे डॉक्टर, बेड उपलब्ध करणे, अंमलबजावणीसाठी यंत्रणांनी काटेकोर पालन करावे, असे पर्याय ठेवल्यास कोरोना नियंत्रण शक्य असल्याचे लोकप्रतिनिधींनी सांगितले.
नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करावी
कोरोनाची साखळी खंडित (ब्रेक द चेन) करण्यासाठी राज्य शासनाने पारित केलेल्या नियमावलीची जळगाव जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले. ते म्हणाले की, जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी बाधित व्यक्तीच्या संपर्कातील रुग्णांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करावी, त्याचबरोबर रुग्णांना आवश्यक ते उपचार तातडीने मिळण्यासाठी आरोग्य यंत्रणेने रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सोईसुविधा उपलब्ध राहतील याची काळजी घ्यावी, रस्त्यांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी निर्बंध कालावधीत विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस विभागाने कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.
रेमडीसिविरचा साठा पुरेसा ठेवावा, रुग्णालयांमध्ये पुरेसे व्हेंटिलेटर राहतील याचे नियोजन करावे, अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेताना विनाकारण गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
चोपडा येथे तातडीने व्हेंटिलेटर द्या
कोविडवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांमध्ये दरपत्रक लावणे बंधनकारक करण्याबरोबरच रुग्णांना रुग्णालयांची बिल देणे आवश्यक असून, चोपडा येथे तातडीने व्हेंटिलेटर उपलब्ध करण्याची सूचना खासदार रक्षा खडसे यांनी केली, तर कंटेन्मेंट झोनची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सूचना खासदार उन्मेष पाटील यांनी केली.
भुसावळ येथील रेल्वेचे हॉस्पिटल ताब्यात घ्या
संजय सावकारे यांनी बाधित रुग्णांना वेळेवर उपचार होण्यासाठी भुसावळ येथील रेल्वेचे हॉस्पिटल ताब्यात घेण्याची सूचना केली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. नागरिकांमध्ये शिस्त निर्माण करणे आवश्यक असल्याचे आमदार शिरीष चौधरी म्हणाले.
स्मशानभूमी रात्रीच्या वेळी सुरू रहावी
कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी रात्रीच्यावेळी सुरू रहावी याकरिता महानगरपालिकेने आवश्यक ते नियोजन करण्याची सूचना आमदार सुरेश भोळे यांनी केली, तर जिल्ह्यात शासनाच्या नियमावलीची कठोर अंमलबजावणी न झाल्यास लॉकडाऊन करावा तसेच कोरोनामुळे ग्रामीण भागातील जनतेत भीतीचे वातावरण आहे. ग्रामसेवक, तलाठी यांनी कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.
रेमडीसिविर इंजेक्शन मुलबक
जिल्ह्यात मागील दोन, तीन दिवस रेमडीसिविर इंजेक्शनचा तुटवडा होता. आता मुलबक साठा असून, अजून इंजेक्शन उपलब्ध होणार आहे. प्रशासनाच्या वतीने कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींचे आवश्यक ते सहकार्य मिळत असून, जिल्हावासीयांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यावेळी केले, तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना सर्व पोलीस प्रभारींना दिल्या असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले.