वन्यजीव दिन विशेष
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - जिल्ह्याला सातपुडा पर्वताच्या रुपात निसर्गाने अनमोल खजिना दिला आहे. सुमारे १२० ते १३० किमीचा भाग जळगाव जिल्ह्याला लागून असून, सातपुड्याचा वनराईत दुर्मीळ वनस्पतींसह अनेक दुर्मीळ प्राण्यांची देखील नोंद झाली आहे. दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या अनेक जीवांसाठी सातपूडा पर्वत एक अधिवास क्षेत्र म्हणून अनेक वर्षांपासून विकसीत झाले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या वनराईत सुरु असलेली अवैध वृक्षतोड, जंगलामध्ये शेतीसाठी होत असलेले अतिक्रमण, लावण्यात येणारे वणवे यामुळे सातपुड्यातील दुर्मीळ वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आला आहे.
सातपुड्यातील या भागात आढळतात वन्यजीव
जिल्ह्यातील जैवविविधता समृध्द असून, जळगाव वनक्षेत्रासह सातपुड्यातील यावल वनक्षेत्र, पाल वनक्षेत्र, अनेर, मनुदेवी परिसर, अडावद, चोपडा भागात देखील वन्यजीवांचा अधिवास आहे. या ठिकाणी वाघ, बिबट्या, तडस, कोल्हे, लांडगे, रानकुत्री, अस्वल, खवले मांजर, साळींदर, शषकर्ण मांजर, हरीण प्रजातीत चिंकारा, भेकर, काळवीट, निलगाय, पिसोरी, चौसिंगा यांसारख्या वन्यजीवांच्या नोंदी वन्यजीव अभ्यासकांनी वेळोवेळी घेतल्या आहेत. मात्र, शासनाची उदासीन भूमिका, वनक्षेत्रात वाढते अतिक्रमण, चोरट्या शिकारी या सर्व कारणांमुळे वन्यजीवांच्या हक्काच्या घरावरच गदा आली आहे.
सातपुड्यात वन्यजीवांच्या आढळलेल्या विविध जाती
३० प्रजातींचे सर्प
१२०० प्रकारच्या वनस्पती
२० प्रजातींचे ऑर्किड
३५५ प्रजातींचे पक्षी
१०९ प्रकारचे फुलपाखरे
38 प्रजातींचे हिंस्त्र व तृणभक्षी वन्यजीव
गेल्या आठ दिवसांपासून धुमसतोय सातपुडा
उन्हाळ्यात वनविभागाकडून जंगलात आगी लावल्या जातात. मात्र, या आगीवर नियंत्रण देखील वनविभागाकडून तत्काळ आणले जाते. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून अडावद, वरगव्हाण भागातील वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वणवा पेटला असून, वनविभागाला हा वणवा आटोक्यात आणण्यात अपयश येत आहे. सुमारे ५०० हून हेक्टर क्षेत्र आगीत जळून खाक झाले आहे. यामध्ये अनेक सरपटणाऱ्या जीवांसह पक्ष्यांचा देखील मृत्यू झाला आहे. याबाबत वन प्रशासन पुर्णपणे अपयशी ठरले आहे.
कोट...
सातपुड्यात आणि जिल्ह्यातील विविध भागात वनपिंगळा, ट्री क्रिपर, व्हीगर्स सनबर्ड, स्टोर्क बिल्ड किंगफिशर, ब्लॅक ईगल, लॉंग लेग बझार्ड, व्हाईट कॅप बंटिंग, सारखे अनेक पक्षी, पाण मांजर, भारतीय अंडीखाऊ सर्प, अनेक दुर्मिळ ऑर्किड , दुर्मिळ कंदिलपुष्प वनस्पती, सोबतच वाघ, रान गवा, रान कुत्रे, लांडगे, विंचू, फुलपाखरे, कीटक, स्पायडर , तसेच डोर्फ गुरांमी मासा , श्रीम्प, आणि खेकड्यांच्या च्या वैशिष्ट्य पूर्ण नोंदी आम्ही घेतल्या आहेत.
- राहुल सोनवणे, अभ्यासक वन्यजीव संरक्षण संस्था, जळगाव
सद्यस्थितीत वनविभागाच्या नियमित गस्ती मुळे शिकार आणि इतर वनगुन्ह्यावर नियंत्रण आले असले तरी वनकर्मचार्यांवर अतिरिक्त ताण असतो त्यातच या दिवसात अतिक्रमण करण्या साठी वणवे लावले जातात मनुष्यबळ कमी असल्याने वनविभागाची अडचण वाढते यावल वन्यजीव विभागात दोन रेंज ऑफिस आणि तरुण प्रशिक्षित स्टाफ वाढवणे गरजेचे आहे.
- रवींद्र सोनवणे, वन्यजीव अभ्यासक
शहरालगत नेहमीच नीलगाय, चितळ, लंगुर, अनेक जातीचे सर्प, पक्षी, जखमी अवस्थेत आढळत असतात. वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे वाईल्डलाईफ री हँबिलेटेशन सेंटर सुरू करण्या संदर्भात प्रस्ताव बनवत आहोत. लवकरच तो वनविभागास सादर केला जाईल. यासाठी कात्रज सर्प उद्यान, आणि वन्यजीव अनाथालय चे कुंदन हाते यांचे मार्गदर्शन घेतले जाईल.
- बाळकृष्ण देवरे, वन्यजीव संरक्षण संस्था, जळगाव