जळगाव : रोटरी क्लब जळगाव इलाईट व ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने खडकी (ता. जामनेर) येथे मोफत विविध रोगनिदान शिबिर झाले. यात सुमारे ६०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात रुग्णांना औषधी आणि गोळ्यासुद्धा मोफत देण्यात आल्या.
ज्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे, त्या रुग्णांवर रोटरी क्लब जळगाव इलाइटच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिरात ईएनटी सर्जन डॉ. मुर्तुझा अमरेलीवाला, फिजिशियन डॉ. अंजुम अमरेलीवाला, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. पंकज शहा, डॉ. दर्शना शहा, बालरोग तज्ज्ञ डॉ. अमोल सेठ, डॉ. वरुण सरोदे, डॉ. वृषाली सरोदे, दंतरोग तज्ज्ञ डॉ. विशाल जैन, डॉ. दिव्या जैन, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. राजेश नाईक, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रताप पाटील आदींनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात प्रोजेक्ट चेअरमन डॉ. वैजयंती पाध्ये, क्लबचे अध्यक्ष नितीन इंगळे, सचिव संदीप असोदेकर आदींनी स्वयंसेवक म्हणून सेवा बजावली. या उपक्रमास सरपंच किशोर नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सहकार्य केले.