पाळीव जनावरांना होणाऱ्या तोंडखुरी, पायखुरी यासह इतर विषाणूजन्य आजारांपासून संरक्षण होण्यासाठी मे महिन्यात लसीकरण मोहीम हाती घेतली जाते. मात्र, गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही शासनातर्फे काही लसीचा पुरवठा वेळेवर न झाल्यावर पशुसंवर्धन विभागाला राबविण्यात येणाऱ्या लसीकरणाच्या मोहिमेला विलंब झाला आहे. पशुसंवर्धन विभागातर्फे पाळी जनावरांना वर्षांतून दोनवेळा लसीकरण करण्यासाठी एक पावसाळ्यापूर्वी व दुसरा पावसाळ्यानंतर लसीकरणाचा टप्पा आयोजित केला जातो. पहिला टप्पा मार्च ते मे महिन्यात आयोजित केला जातो. मात्र, पहिल्या टप्प्यातच यंदा ‘लाळ खुरकत’ची लस शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली नाही. मार्चमध्ये या लसीचा पुरवठा होणे अपेक्षित असताना, सहा महिने उलटूनही ही लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील विविध वयोगटातील साडेसात लाख पशुधनांचे लसीकरण रखडले आहे. जनावरांना या लसी कधी मिळणार, याची शेतकरी बांधवांनादेखील प्रतीक्षा लागून आहे.
इन्फो :
सध्या तीन लाख २१ हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण
जिल्हा पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील विविध गटातील गाय, म्हैस, बैल आदी पाळीव २ लाख ४९ हजार ४४ इतक्या जनावरांना घटसर्प व फऱ्यावरील लसी देण्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच शेळी व मेंढी वर्गवारीतील ५३ हजार ४८ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असून, एकूण ३ लाख २१ हजार ४ इतक्या जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
जिल्ह्यातील पाळीव जनावरांना घटसर्प, फऱ्या व इतर रोगांवरील लसीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, लाळ्या खुरकतची लस उपलब्ध न झाल्यामुळे, हे लसीकरण रखडले आहे. या महिन्यात ही लस उपलब्ध होणार असून, महिना भरात सर्व पाळीव जनावरांना ही लस देण्यात येईल.
-रामदास जाधव, प्रभारी पशुसंवर्धन अधिकारी