मोबाईलच्या जमान्यातही २७ हजार ग्राहकांकडे लँड लाईन फोन
सुविधा : कॉईनबॉक्सची ‘ट्रिंग ट्रिंग’ झाली इतिहास जमा
जळगाव : साधारणत: वीस वर्षांपूर्वी बहुतांश घरांमध्ये बीएसएनएलचे लँड लाईन फोन हे एकमेव संवादाचे माध्यम होते. मात्र, कालांतराने संवादाचे सुलभ माध्यम म्हणून मोबाईल फोन आल्यामुळे, याचा लँड लाईनच्या ग्राहक संख्येवर मोठा परिणाम होऊन, लँड लाईन फोन इतिहास जमा होण्याची शक्यता दिसून येत होती. मात्र, आजच्या मोबाईलच्या जमान्यातही जिल्ह्यातील २७ हजार ग्राहकांकडे लँड लाईन फोन आहेत. मात्र, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्यानंतर `क्वाईनबॉक्स`ची ‘ट्रिंग ट्रिंग’ ही कायमस्वरूपी इतिहास जमा झाली आहे.
भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलच्या जळगाव विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २० ते २५ वर्षांपूर्वी जिल्ह्यात एक लाखाहून अधिक बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या होती. शहरासह ग्रामीण भागात लँड लाईन फोनच संवादाचे एक प्रभावी माध्यम होते. मात्र, मोबाईलचे युग आल्यानंतर अनेकांनी घरगुती फोन बंद करून मोबाईलला पसंती द्यायला सुरूवात केली. त्यामुळे गेल्या काही वर्षांत बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली असून, २७ हजार ग्राहकांवर येऊन पोहचली आहे. सध्या विविध सरकारी कार्यालये, शाळा-महाविद्यालये व खाजगी संस्थांमध्ये अद्यापही लँड लाईनचा वापर असून, अनेक नागरिकांकडूनही घरगुतीसाठी लँड लाईनचा वापर होत असल्यामुळे लँड लाईनचे अस्तित्व टिकून असल्याचे बीएसएनएलतर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
जिल्ह्यात २७ हजार लँड लाईन
बीएसएनएल विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरी व ग्रामीण भाग मिळून जिल्ह्यात २७ हजार ४६२ लँड लाईन फोन आहेत. यामध्ये सर्वाधिक १३ हजार १५४ कनेक्शन हे जळगाव शहरातील आहेत. तर सर्वाधिक कमी २८८ कनेक्शन हे बोदवड शहरात असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
जिल्ह्यात एकही नागरिकाकडे कॉईनबॉक्स नाही :
मोबाईलचे युग आल्यानंतर घरगुती लँड लाईन प्रमाणे कॉईनबॉक्सचे फोनही कमी होऊ लागले. सुरुवातीच्या काळात फक्त एका रूपयात ६० सेकंद देशभरात कुठेही बोलता येत असल्यामुळे, नागरिकांचा या बीएसएनएलच्या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद होता. मात्र, कालांतराने प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्यामुळे, अनेक ग्राहकांनी आपल्याकडील कॉईनबॉक्सचे कनेक्शन बंद केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या एकही नागरिकाकडे बीएसएनएलचे कॉईनबॉक्स नसल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
सध्या प्रत्येकाकडे मोबाईल असला तरी, घरात जुन्या वयोवृद्ध नागरिकांना मोबाईल फारसा समजत नाही. त्यांचा गोंधळ उडतो. त्यामुळे घरातील वृद्ध नागरिकांसाठी घरात लँड लाईन कनेक्शन अजूनही ठेवले आहे.
-प्रशांत वाणी
मोबाईल फोन आले असले तरी, आजही अनेक नातलग लँड लाईनवर फोन करत असतात. आता मोबाईल फोनचाच वापर जास्त असल्यामुळे, फारसे बिल येत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून लँड लाईनचे कनेक्शन घेतले असल्यामुळे, अनेकांकडे घरचा फोन आहे. त्यामुळे लँड लाईन फोन कायम ठेवला आहे.
-सुनील येवले