ग्रामपंचायतीला दिलासा: ३० उमेदवारांनी फाडल्या पावत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद: घरपट्टी व पाणीपट्टी करांची थकबाकी सुमारे सव्वाकोटी रूपयांच्या घरात गेल्याने बेजार झालेल्या ग्रामपंचायतीची गेल्या १५ दिवसांत तब्बल सव्वादोन लाखांची कर वसुली झाली आहे. हा चमत्कार नामनिर्देशन पत्रे सादर करणाऱ्या तब्बल ३० उमेदवारांनी एकाचवेळी पावत्या फाडल्याने झाला असून, त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला थोडाफार दिलासा मिळाला आहे.
ममुराबाद ग्रामपंचायतीकडून दरवर्षी घरपट्टी व पाणीपट्टी व अन्य करापोटी सुमारे २० लाख रुपयांची आकारणी ग्रामस्थांना केली जाते. त्याबद्दल प्रशासनाकडून रीतसर बिलेसुद्धा बजावली जातात. प्रत्यक्षात फारच थोडे ग्रामस्थ नियमितपणे भरणा करीत असल्याने विविध करांच्या थकबाकीचा आकडा आतापर्यंत एक कोटी ३० लाख रुपयांच्या घरात गेला आहे. ग्रामस्थांकडे येणे बाकी असलेल्या करांच्या थकबाकीचा डोंगर दिवसेंदिवस वाढत असतांना दिवाबत्ती, सार्वजनिक स्वच्छता, पाणी योजना देखभाल व दुरुस्ती तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन, यासाठी आर्थिक तरतूद करताना ग्रामपंचायतीच्या अगदी नाकीनव आले आहेत. पुरेशा निधीअभावी विकासकामांना खीळ बसल्याच्या स्थितीत नियमित कर भरणाऱ्या ग्रामस्थांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या निमित्ताने थोडीफार करवसुली झाली असली तरी आभाळ फाटल्यागत परिस्थिती झालेल्या ग्रामपंचायत प्रशासनाला त्यातून कोठे कोठे ठिगळ लावावे? असा प्रश्न पडला आहे.
---------------------------
कर्मचाऱ्यांचे वेतन नेहमीच थकीत
ग्रामपंचायतीकडून घरपट्टी व पाणीपट्टी करांच्या वसुलीबद्दल एरवी फार गांभीर्य बाळगले जात नसल्याने ग्रामस्थही बिनधास्त असतात. उतारा किंवा दाखल्याची गरज पडली तरच थकबाकी भरली जाते, अन्यथा ग्रामपंचायतीकडे कोणीच फिरकत नाही. पूर्वी पंचायत समितीकडून करवसुलीसाठी खास पथकाची नियुक्ती केली जात असे. आता तसे काहीच होत नसल्याने त्याचा मोठा परिणाम ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनावरही झाला आहे. बऱ्याच कर्मचाऱ्यांना गेल्या काही महिन्यांपासून नियमित वेतन मिळू शकलेले नाही. त्यांच्या प्राॅव्हिडंट फंडाची रक्कमसुद्धा वेळेवर भरण्यात आलेली नाही. त्यामुळे निवडणुकीनंतर नव्याने सत्तेवर येणाऱ्या पदाधिकाऱ्यांसमोर गावातील थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान असणार आहे.