जामनेर : घरची गरिबीची परिस्थिती, शिकण्याची प्रबळ इच्छा असल्याने प्राथमिक शिक्षण गावातील जि. प. शाळेत घेऊन माध्यमिक शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी पूर्ण केले. वडिलांच्या परिचयातील सदगृहस्थ डॉ. माधवराव गोविंदराव दाभाडे यांनी उज्जैन (मध्यप्रदेश) येथे नेले व एम. ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून दिले. त्याच्यामुळेच माझे जीवन घडले, तेच माझे गुरु, अशी कृतज्ञतेची भावना येथील सेवानिवृत्त प्रा. ए. डी. पवार यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.
प्रा. पवार हे मूळ अंबिलहोल (ता.जामनेर) या गावातील रहिवासी. आदिवासी भिल्ल समाजातील ते पहिले उच्चशिक्षित आहेत. वडिलोपार्जित तीन एकर शेती गावाजवळच असल्याने शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबाचा गाडा ओढला जात असे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणानंतर पुढे काय, हा प्रश्न होताच. डॉ. दाभाडे हे वडिलांचे मित्र व गावातील एकाचे मामा होते. त्यांनी पवार यांची शिक्षणाची जिद्द पाहून त्यांना उज्जैन येथे बोलावून घेतले. डॉ. दाभाडे हे एम. ए., पीएच.डी होते. त्यांच्या प्रयत्नाने प्रवेश मिळाला व वसतिगृहात जेवणाची व राहण्याची व्यवस्था झाली.
इतकेच नव्हे तर शिक्षणाचा इतर खर्चदेखील त्यांनीच उचलला.
पवार हे डॉ. दाभाडे यांनाच गुरु मानतात व त्यांच्यामुळेच मला जीवन जगण्याची दिशा मिळाली, असे कबूल करतात. त्यांच्या घरात वडिलांच्या फोटोशेजारी डॉ. दाभाडे यांचाही फोटो लावलेला आहे. उज्जैन येथून शिक्षण घेऊन परतल्यानंतर नोकरीच्या शोधात असतानाच जामनेर शिक्षण संस्थेत १९७१ ला महाविद्यालय सुरू झाल्याने त्यांना नोकरीची संधी मिळाली.
गरिबांच्या पोरांनी शिकले पाहिजे
स्वतः कष्टातून शिक्षण घेतले असल्याने त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजले होते. त्यामुळे गरीब कुटुंबातील मुलांनी शिकले पाहिजे, हे ध्येय उराशी बाळगून त्यांनी गंगापुरी (ता.जामनेर) येथील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा खर्च उचलला. ग्रामीण भागातून शिकण्यासाठी जामनेर महाविद्यालयात येणाऱ्या मागासवर्गीय मुलांसाठी त्यांनी संस्थाचालकांच्या मदतीने वसतिगृह सुरू केले.
महात्मा फुलेंचा पगडा
पवार यांच्यावर महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारांचा पगडा असून, राष्ट्र सेवादलाशी त्यांची वैचारिक बांधीलकी आहे. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा सहवास लाभल्याने ५ वर्षे त्यांनी जामनेरला अंधश्रद्धा निर्मूलन समितीत काम केले. सेवा दलाचे शिबिर जामनेरला झाले असताना महाविद्यालयाच्या इमारतीच्या पहिल्या मजल्याचे काम सुरू होते. शिबिरार्थींनी यात श्रमदान केल्याची आठवण त्यांनी सांगितली.
समाजसेवक बाबा आमटे यांच्या आश्रमात गेलो असल्याने त्यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेतून वृक्ष दिंडीची संकल्पना राबवता आली.
आजची शैक्षणिक स्थिती हलाखीची आहे. अजूनही ग्रामीण भागात आदिवासी समाजात शिक्षणाचे प्रमाण कमीच आहे. शिकल्यानेच समाज पुढे जातो, ही जाणीव निर्माण झाली पाहिजे, असे ते आवर्जून सांगतात. बदलत्या काळानुसार शिक्षक विद्यार्थी यांचे नातेदेखील बदलत आहे. आम्ही विद्यार्थ्यांना संपत्ती मानत असू, आजच्या शिक्षकांमध्ये ही भावना दिसून येत नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली.
सेवानिवृत्तीनंतर पवार शेताकडे लक्ष देतात. लग्न झाले, त्यावेळी त्यांच्या पत्नीचे शिक्षण आठवीपर्यंत झाले होते. लग्नानंतर पतीच्या पाठबळामुळे संसार सांभाळून त्यांनी बी.ए. बीएड केले. न्यू इंग्लिश स्कूलमधून मुख्याध्यापिका पदावरून त्या निवृत्त झाल्या.
040921\04jal_1_04092021_12.jpg
जीवन जगण्याची दिशा दाखवीणारे डॉ. दाभाडे हेच गुरु