सभांवर निर्बंध
जळगाव - कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आता आगामी जिल्हा परिषदेच्या सभांवरही निर्बंध येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. स्थायी समितीची तहकूब सभेची अद्याप तारीख ठरली नसून अध्यक्षा रंजना पाटील काय निर्णय घेणार त्यानुसार सभा होतील, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
साडे चार लाखांवर चाचण्या
जळगाव : जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या ४५८८६७ वर पोहोचली आहे. फेब्रुवारीत दुसऱ्या आठवड्यापासून नियमीत अडीत ते तीन हजार चाचण्या होत असल्याने ही संख्या वाढली आहे. यात २ लाख ७६ हजार ५ ॲन्टीजन तर १८२६६२ आरटीपीसीआर चाचण्या झालेल्या आहेत.
रुग्ण वाढले
जळगाव : इतर जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढली असून यात शुक्रवारी ७ जण बाधित आढळून आले आहेत. यात सक्रिय रुग्णांची संख्या २३ वर पोहोचली असून हे २३ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. इतर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ५४३ वर पोहोचली आहे. यातील ५२० रुग्ण बरे झालेले आहेत.
ओपीडी घटली
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील नियमीत ओपीडीची संख्या घटली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने यावर परिणाम झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. नियमीतपेक्षा शुक्रवारी सकाळच्या सुमारास रुग्णालय परिसरात गर्दी कमी झालेली होती. सिव्हीलमध्ये सीटू आणि सीथ्री कक्षात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहे.
खासगी रुग्णालयांना परवानगी
जळगाव : शहरातील आणखी दोन खासगी रुग्णालयांना कोविड उपचारासंदर्भात परवानगी देण्यात आली आहे. एका इमारतीत कोविड नॉन कोविड एकत्र नको, या निकषानुसार आता ही परवानगी देण्यात येत आहे. अचानक रुग्ण वाढल्याने खासगी रुग्णालयांची संख्या वाढल्याचे चित्र आहे.
ग्रामसेवकांवर लक्ष
जळगाव : शाळांवर गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर आता ग्रामसेवक व अन्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत नियमीत आढावा घेतला जाणार असून कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. सीईओंनी यासाठी पथकांची नियुक्ती केलेली आहे.
ग्रामसेवक पुरस्कार रखडले
जळगाव : उत्कृष्ट काम करणाऱ्या व गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा पुन्हा कोरोनामुळे संकटात सापडला आहे. जि. प. ग्रामपंचायत विभागाल यासाठी मुहूर्तच मिळत नसल्याने हे ग्रामसेवक कागदावरच उत्कृष्ट राहिले आहेत. ४५ ग्रामसेवकांची तीन वर्षांपासून निवड करण्यात आली आहे. मात्र, याचे वितरणच झालेले नाही.