जळगाव : शहरातील वेगाने वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहराचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी शहरात असलेल्या सर्व कोविड सेंटरची आज पाहणी केली. या पाहणी दरम्यान अनेक बेड रिकामे असल्याचे आढळून आले. यामुळे कमी लक्षणे असलेल्या रुग्णांनाही गृहविलगीकरणची सुविधा न देता, कोरोना सेंटरमध्ये काही दिवस उपचारासाठी ठेवण्यात यावे, अशी सूचना उपमहापौरांनी दिली आहे. अनेक रुग्णांना गृहविलगीकरणची सुविधा दिल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कोरोना सेंटरमध्ये सर्व रुग्णांवर उपचार करण्यात यावे, अशी सूचना उपमहापौरांनी दिल्या. यावेळी मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ.रावलानी यांच्यासह अनेक पदाधिकारीही उपस्थित होते.
निवारा केंद्रासाठी ढवळे पाटील सेवा प्रतिष्ठानसोबत करार
जळगाव : महापालिका मालकी असलेल्या नवीन बस स्थानक परिसरातील निवारा केंद्रासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली होती. या निविदा प्रक्रियेनुसार शहरातील आदित्य ढवळे पाटील सेवा प्रतिष्ठान या संस्थेला एक वर्ष करारांतर्गत हे निवारा केंद्र देण्यात आले आहे. या आधी केशव स्मृती प्रतिष्ठानसोबत महापालिकेने एक वर्षाचा करार केला होता.
१० एप्रिलनंतर पुन्हा पावसाचा अंदाज
जळगाव : जिल्हाभरात तापमानात प्रचंड वाढ होत असून, पारा आता ४२ अंशांवर पोहोचला आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरावर निर्माण होणाऱ्या चक्रीवादळामुळे १० एप्रिलनंतर राज्यभरात पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. १० ते १३ एप्रिल दरम्यान जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
भंगार बाजारावरील कारवाई रखडली
जळगाव : शहरातील अजिंठा चौक परिसरातील भंगार बाजाराची मुदत संपल्याने, हा बाजार ताब्यात घेण्याबाबत महापालिका प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी झालेल्या महासभेत ठराव मंजूर करून घेतला होता. मात्र, दोन महिने झाल्यावरही अद्यापही भंगार बाजाराबाबत महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. जे.के. पार्कनंतर भंगार बाजार बाबतही मनपा प्रशासनाचे उदासीन धोरण पाहावयास मिळत आहे.