दापोरी बुद्रूक येथे आत्महत्या
पातोंडा, ता.अमळनेर : डोक्यावरी कर्जामुळे हताश झालेल्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना दापोरी बुद्रूक, ता. अमळनेर येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
पंढरीनाथ काशिनाथ पाटील(५३) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याने पहाटे तीन वाजता घरातील छताला गळफास घेतला. सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या शेतकऱ्याकडे ८ ते १० बिघे शेतजमीन आहे. त्यांच्यावर विका सोसायटीचे २,२५,००० पीक कर्ज थकलेले होते. तसेच त्यांनी बाहेरील पण पैशांची हात उचल केली असल्याचे समजते. गेल्या तीन-चार वर्षांपासून बोंडअळी, बेमोसमी पाऊस, दरवर्षी येणारी उत्पादनात घट आणि नापिकीमुळे ते बिकट आर्थिक संकटात होते.
शेतीला लागणारा खर्च, घर खर्चामुळे ते नैराश्येत होते. या कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली,असे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, भाऊ,जावई,नातवंड असा परिवार आहे. ते ग्रा.पं.चे माजी सदस्य साहेबराव काशिनाथ पाटील यांचे लहान भाऊ होत.