सायगाव, ता.चाळीसगाव : सायगाव येथून जवळ असलेले मन्याड धरण एवढे अक्राळविक्राळ होईल, असे कोणालाही वाटले नव्हते. पण निसर्गाच्या पुढे कोणीही नाही. अशीच सर्वात मोठी घटना घडली ती नांद्रे या अत्यंत छोटेशा गावात.
मन्याड धरणात अचानक वाढ झाली. त्याअगोदर मंगळवारी रात्री गावातील नातलगांना बिरोळे आणि सावरगाव येथून फोन आले आणि तुम्ही सावध राहा, मन्याड धरणात वाढ होत आहे आणि नांद्रे येथील ग्रामस्थांना धरणाचे अक्राळविक्राळ रूपचे संकेत मिळाले होते. तेवढ्यात भयानक पुराने थैमान घातले आणि नांद्रे येथील पुलाजवळील खालचा भाग पूर्णपणे पाण्याखाली गेला. संपूर्ण गावाला पाण्याने वेढा घातला आणि नांद्रे गावाचा संपर्क तुटला. विज गूल झाली आणि गावांतील लहान मुले, महिला, म्हातारे सर्वांच्या डोळ्यात पाण्याच्या धारा वाहत होत्या. आता काय होणार प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंता वाटत होती.
अजून लोकप्रतिनिधी फिरकलेच नाही
एवढा मोठा प्रसंग नांद्रे या छोट्याशा गावावर आला. प्रत्येकाच्या डोळ्यात आसू होते. हातावर मोलमजुरी करणाऱ्या गोरगरीब लोकांना खायला अन्न नाही, गुराढोरांना चारा नाही आणि नांद्र्याच्या इतिहासातील सर्वात मोठा वाईट प्रसंग आला. अजून आमदार मंगेश चव्हाणवगळता एकही प्रतिनिधी नांद्रे गांवी भेट द्यायला आलेला नाही. राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे हेदेखील जवळ येऊन नांद्रे गावाकडे फिरकले नाही. नांद्रे गावाकडे जाणारा रस्ता पूर्णत: पाण्यात वाहून गेला असून, सध्या तिथे काम चालू आहे.
..आम्हाला मदत पाहिजे
नांद्रे या गावात सध्या पुराच्या पाण्याने होरपळून निघालेल्या ग्रामस्थांच्या मनामध्ये अजूनदेखील भीतीचे वातावरण असून, त्यांना पूर्वपदावर येण्यासाठी भरपूर वेळ लागणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. नांद्रे येथे फक्त प्रांत तहसीलदार यांनी येऊन भेट दिली आहे. नांद्रे येथे जाण्या-येण्यासाठी सध्या तात्पुरता रस्त्याचे काम सुरू आहे.
कॉंक्रिटीकरणाच्या भिंतीची मागणी
नांद्रे गावाला धोका पोहोचला तो मन्याड धरणाच्या सांडव्याजवळील मातीच्या भरावामुळेच. मातीचा भराव फुटल्याने संपूर्ण पाण्याने नांद्र्याला वेढा दिला आणि सर्व नांद्रे येथील खालच्या नदी काठची घरे पाण्याखाली गेल्याने सर्व धान्य व इतर संसार वाहून गेला. आज खायला अन्न नाही. त्यामुळे शासनाने मातीचा भराव न करता तेथे मजबूत काँक्रिटीकरणाची भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी नांद्रे येथील ग्रामस्थांनी केली आहे.
तात्काळ नुकसानभरपाईची मागणी
नांद्रे गावाला मन्याड धरणाने सर्वात मोठा तडाखा दिल्याने गावातील घरांचे नुकसान तर झालेच; परंतु शेतीचे सर्वात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अक्षरशः मका, कापूस, ऊस व इतर पिके पूर्णत: वाहून गेली. एवढेच नव्हे शेतात मातीदेखील नाही. या नुकसानाची कधीच पोकळी भरून निघणार नाही. त्यामुळे शासनाने पंचनामे तर पूर्ण केले. आता फक्त तात्काळ मदत देण्यात यावी आणि नांद्रे गाव लवकरात लवकर पूर्वपदावर आणावे, अशी मागणी होत आहे.