अमळनेर : यावर्षी देखील पुनर्वसनाची कामे खोळंबली आणि धरणाची उंची वाढली नाही म्हणून कोट्यवधी लिटर पाणी पुरातून निम्न तापी प्रकल्पाच्या पाडळसरे धरणावरून वाहून गेले आहे.
२०१८ मध्ये निम्न तापी प्रकल्पाची किंमत २७५१.०५ कोटी झाली होती. धरण पूर्ण झाल्यास टप्पा एक मध्ये ४३ हजार ६०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. सध्या फक्त १२.९७ दशलक्ष घनमीटर जलसाठा धरणात रहात असल्याने फक्त ३ हजार हेक्टर क्षेत्रात सिंचन होते.
गेल्या युती सरकारच्या काळात नदीपात्रातील प्रस्तंभाच्या सुधारित संकल्प चित्रास मान्यता मिळाली नव्हती. त्यामुळे आजही धरणाचे काम ४३ टक्क्यांवर अडकले आहे. म्हणून यावर्षी देखील दोन पुरात लाखो क्यूसेस पाणी वाहून गेले आहे. वेळीच धरणाचे काम झाले असते तर गेल्या काही वर्षात तालुक्यात कायापालट होऊन सिंचन क्षेत्र वाढले असते. बागायती उत्पन्नामुळे शेतकऱ्यांना दुबार, तिबार पीक घेता आले असते. शेतकरी परिणामी चोपडा, अमळनेर, पारोळा, शिंदखेडा, धुळे तालुक्याचा कायापालट झाला असता.
हतनूर धरणातून सोडलेले सर्व पाणी गुजरातला वाहून जाते महाराष्ट्राला त्याचा लाभ मिळत नाही. गत काळात जिल्ह्याचे जलसंपदामंत्री असतानाही धरणाच्या कामाला गती मिळालेली नाही.
----
पुनर्वसन रेंगाळले
धरण क्षेत्रात पुनर्वसनाची कामे थांबली आहेत. पुनर्वसन झाल्याशिवाय धरणात पाणी अडवता येणार नाही. सात्री गावच्या पुनर्वसनाच्या कामाला अनेक वर्षे होऊनही अद्याप गाव स्थलांतर करण्याजोगी स्थिती नाही. तसेच सात्री गावाला जायला पूल नसल्याने पावसाळ्यात त्यांचे हाल होतात. डांगरी पुनर्वसन प्रक्रिया कोरोनामुळे अडकली आहे.
आयआयटी पवईकडून सुधारित प्रस्तंभांचे संकल्प चित्र तयार होऊन आले आहे. त्यास सीडीओ नाशिक यांची मंजुरी ती बाकी आहे. त्यामुळे १५ ते ३० ऑक्टोबर दरम्यान पाणी ओसरल्यावर नदीपात्रातील प्रस्तंभाच्या कामाला सुरुवात होईल, असे सांगण्यात येते.
२०१८ मधील २७५१ कोटींची किंमत आता ३४४४ कोटींवर गेली आहे तीन वर्षात सुमारे ७०० कोटींनी किंमत वाढली, मात्र त्याप्रमाणात निधी मिळालेला नाही. आघाडी सरकारच्या काळात आता १३५ कोटी मिळाले आहेत.
निम्न तापी प्रकल्प पाडळसरेवरून पुराचे पाणी वाहून जात आहे. - अनिल पाटील , आमदार अमळनेर विधानसभा मतदार संघ- अनिल पाटील , आमदार अमळनेर विधानसभा मतदार संघ
छाया अंबिका फोटो