लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या वर्षभरापासून विविध उद्योग, व्यवसायांना मंदीचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या लाटेत आता पाणी जार पुरवण्याचा व्यवसाय अडचणीत आला असून मार्च २०२० पूर्वीच्या व्यवसायाच्या तुलनेत आता फक्त २० ते २२ टक्के व्यवसाय राहिला आहे. त्यामुळे आता हे पाणी फिल्टर करून ते जारमध्ये भरणाऱ्या उत्पादकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
मार्च २०१९ मध्ये जळगाव शहरातील सुमारे १२० उत्पादक मिळून शहरात दिवसाला १२ हजाराच्या वर जारची विक्री करत होते. त्यातून उत्पादक तसेच त्यांचे कामगार, वाहतूक करणारे अशा सर्वांच्या रोजगाराचा प्रश्न सुटत होता. पाणी घेऊन त्याला फिल्टर करून चिलरमधून काढून ते थंड केल्यावर जारमध्ये भरले जाते. शहरातील अनेक कार्यालये, लग्न सोहळे, विविध कार्यक्रम या ठिकाणी हे पाणी जार पुरवले जात होते. लग्नाला हजारावर पाहुणे येणार असतील तर पाण्याचे जारदेखील जास्त लागत होते. मात्र आता लग्न सोहळ्यातील उपस्थितीवर मर्यादा आल्याने तेथे जार लागत नाहीत. कार्यालयेदेखील बंद आहेत. जे नागरिक घरी पिण्यासाठी जारचे पाणी मागवत होते त्यांनीदेखील घरात आरओ बसवून घेतले आहेत. त्यामुळे जारचा व्यवसाय जवळपास बंद झाल्यासारखाच आहे.
इंधन दरांनीही येतेय अडचण
गेल्या काही महिन्यांपासून इंधनाचे दर वाढले आहे. त्यामुळे डिलिव्हरी चार्जेस वाढले असले तरी पाणी जारचे दर वाढलेले नाहीत. त्यामुळेही उत्पादक आणि वाहतूकदारांना मोठा फटका बसला आहे.
जारची स्थिती (प्रति दिवस)
मार्च - २०१९ - १२०००
मार्च २०२० - ११०००
मार्च २०२१- २४००
एकूण उत्पादक १२०
दर महिन्याला होणाऱ्या व्यवसायात तब्बल ८० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. आम्ही दर दिवसाला १०० पेक्षा जास्त जारची विक्री करत होतो. मात्र आता दर दिवसाला फक्त २० ते २५ जारची विक्री होत आहे. लग्न सोहळे, कार्यक्रम, कार्यालये बंद आहेत. त्यामुळे पाणी घेणार तरी कोण, असा प्रश्न आहे.
- वैभव डिमके, अध्यक्ष, पाणी जार जळगाव शहर
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आम्ही पाण्याचे जार घरी मागवणे बंद केले आहे. त्याऐवजी घरीच फिल्टर बसवण्याचा आमचा विचार आहे. सध्याची परिस्थिती पाहता आम्ही बाटलीबंद पाणी बाहेरून मागवण्यापेक्षा साधेच पाणी पितो.
- कुणाल साखरे
सध्या बाहेरून पाणी आणणे किंवा कुणाला तरी त्यासाठी घरी बोलवणे योग्य नाही. त्यातून संसर्गाची शक्यता पाहता आम्ही साधे पाणी पिण्यालाच प्राधान्य देत आहोत. पाण्याचे जार घरी मागवणे बंद केले आहे.
- अश्विन पाटील