जळगाव : प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या नावाने जिल्ह्यातील प्रशिक्षण केंद्रांना ९४ लाख १४ हजार ८५३ रुपयांचा गंडा घालणाऱ्या अविनाश ऊर्फ अर्जुन कळमकर याच्याविषयी पोलिसांकडे दोन दिवसात नऊ जिल्ह्यातील १३ ठिकाणच्या १०६ प्रशिक्षण केंद्रचालकांनी तक्रारी केल्या आहेत. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर व सुपा येथील कार्यालयात पाणलोट योजनेचे काही कागदपत्रे व नियुक्तिपत्रे आढळून आली आहेत. त्यामुळे आणखी या नवीन प्रकरणात वेगळा गुन्हा दाखल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी अहमदनगर, पारनेर, सुपा व दैठणे गुंजाळ येथे जाऊन चौकशी व धाडसत्र राबविले. यात संस्थांचे कागदपत्रे, शिक्के, बँक पासबुकसह पाणलोट योजनेशी संबंधित ग्रामपंचायतींचे प्रस्ताव व नियुक्ती आदेश मिळून आलेले आहे. दरम्यान, ज्या नोटांचे फोटो कळमकर फिर्यादी व तक्रारदारांना दाखवायच्या त्या नोटांबाबत पुण्यात गुन्हा दाखल झालेला असून, त्यात १४ लाखांच्या नोटा खऱ्या आहेत तर उर्वरित नोटा बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. या नोटा कळमकर याच्या मित्राच्या होत्या, त्याच्याजवळ बसून त्याने फोटोसेशन केलेले आहे, याच फोटोच्या माध्यमातून तो केंद्रचालकांची दिशाभूल करीत होता, असेही पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, हिंगोली २, नागपूर २, गणेशनगर ८, विश्रामवाडी ४, अमळनेर ४५, धुळे १, तळोदा १, अकोला ५, नाशिक ३२, संगमनेर ३ व गुलेवाडी ३ अशा १०६ केंद्रचालकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे फसवणूक झाल्याबाबत तक्रारी केल्या आहेत. यांच्याकडून परीक्षा शुल्क पोटी ३८ लाख ८८ हजार ५०० रुपये, तर विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याच्या प्रकरणात सहा कोटी ४९ लाख ७६१ हजार रुपयांचा व्यवहार झाल्याचे या तक्रारीत नमूद आहे, यात नेमके तथ्य काय याची चौकशी पोलीस करीत आहेत.
पोलीस अधीक्षकांनी स्वत: केली चौकशी
पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी गुरुवारी सायंकाळी स्वत: एक तास कळमकर याची चौकशी केली. त्यात प्रत्यक्ष दाखल फिर्याद व कळमकर याने दिलेल्या माहितीत बरीच तफावत आढळून आली आहे. पोलीस उपअधीक्षक भास्कर डेरे, तपासाधिकारी संदीप पाटील, सहाय्यक फौजदार मसूद शेख, शफीक पठाण, वसीम शेख व नितीन सपकाळे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.