जळगाव : मंगळवारी सकाळपासून जामनेर आणि वाघुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वादळ आणि पाऊस झाला. त्यात पाच गावांना वादळाचा तडाखा बसला आहे. तेथे पाऊस थांबल्यावर मदत कार्याला सुरूवात करण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांनुसार सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी यांनी ट्विटरवर याबाबत एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. राऊत यांनी सांगितले की, सकाळी भुसावळ आणि जामनेर या दरम्यानच्या पूल देखील पाण्याखाली गेला होता. आता पाणी ओसरु लागले आहे. प्रशासन मदतीचे योग्य ते नियोजन करत आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, सर्व यंत्रणा ही मदतीसाठी तयार आहे. प्रशासनातर्फे येणाऱ्या सूचनांचे पालन करून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देखील राऊत यांनी केले.