फोटो
पारोळा : तामसवाडी ता. पारोळा येथील बोरी नदीवरील बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने बोरी धरणाने रविवारी ५ रोजी धोक्याची पाणी पातळी ओलांडली. रात्री धरणाचे सर्व १५ दरवाजे उघडण्यात आले. यामुळे बोरी धरणाला मोठा पूर आला होता. यामुळे बहादरपूर व पिंप्री गावाचा संपर्क तुटला आहे.
बोरी नदीवर असलेले तामसवाडी गावानजीक नाथबुवा मंदिर, टोळी, मोंढाळे पिंप्रीनजीक, असे मोठमोठे केटी वेयर फुल्ल झाले आहेत. टोळी येथे बोरी नदीकाठाला संरक्षण भिंत बांधण्यात आली होती. ती भिंत या पुराच्या पाण्यामुळे खचली आहे. उंदीरखेडे व श्रीक्षेत्रनागेश्वर या गावांना जोडणारी संपर्क फरशीचा काही भाग पाण्याखाली आल्याने या गावाचा संपर्क तुटला.
बहादरपूर व पिंप्री गावाचा संपर्क तुटला
बोरी धरणाचे गेट उघडण्यात आल्याने बोरी नदीला मोठा पूर आला आहे. मोंढाळे व पिंप्री प्र.उ. या दोन्ही गावांचा संपर्क तुटला. तर बहादरपूर, महाळपूर या गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला. कारण बोरी नदीवरील फरशी ही पाण्याखाली आल्याने वाहतूकच ठप्प झाली आहे. फरशीवरून पाण्याचा मोठा प्रवाह सुरू आहे. ५ रोजीच्या रात्रीपासून या फरशीवर पाणी आले आहे.
नागेश्वर येथे भाविकाचा
तरुणांनी वाचविला जीव
तालुक्यातील तीर्थक्षेत्र नागेश्वर रस्त्यावरील फरशी पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. ६ रोजी सकाळी १० वाजता सोमवती अमावस्येला भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी नागेश्वर येथे जात असतात. परंतु पुलावरून खूप पाणी वाहत असल्याने भाविकांनी रस्त्याच्या कडेला आपली वाहने लावून पाण्यातून वाट काढत मंदिराकडे जात होते. दर्शन घेऊन परत येत असताना पारोळा येथील न्यू बालाजी नगर येथील रहिवाशी विजय जीवन पाटील आणि त्यांचा मुलगा प्रवीण पाटील यांचा पाय घसरला. विजय जीवन पाटील हे पुलावरून खाली पाण्यात पडले. पाण्याच्या प्रवाहात ते फरशी पुलाच्या पाइपमध्ये अडकले. त्याचवेळी उंदीरखेडे येथील तरुण कल्पेश विठ्ठल शिंदे, गणेश बुधा पाटील, सागर शेषराव शिंदे आणि दोन युवकांनी त्यांना मोठ्या शिताफीने त्या पाइपातून बाहेर काढले. तोपर्यंत विजय पाटील यांच्या छातीत पाणी गेल्यामुळे ते बेशुद्ध पडले होते. त्यांच्या छातीतून पाणी काढून तरुणांनी त्यांना प्रथमोपचार दिले आणि खासगी वाहनाने पारोळा येथे उपचारांसाठी रवाना केले. विजय पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
करमाड बुद्रुकला फटका
बोरी धरणाच्या बॅक वॉटरचा सर्वात मोठा फटका करमाड बुद्रुक गावाला बसला आहे. हे बॅक वॉटर काही १० ते १२ घरांमध्ये घुसले होते. या घरातील लोकांना रात्रीच सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते.
सायगावल भिंत कोसळून
महिला जखमी
सायगांव ता. चाळीसगाव येथे घराची भिंत कोसळली. सुदैवाने नाशीब बलवत्तर सुरय्या मन्सुरी ही महिला बचावली आहे. ही महिला जखमी झाली आहे. ही घटना सोमवारी पहाटे पाच वाजता घडली.