भुसावळ : येथील स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, नागरिकांचे हाल होत आहेत. या रस्त्यामुळे काहींचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. रिक्षाचालकदेखील या रस्त्याने ग्राहकास नेण्यास बऱ्याच वेळेस नकार देतात. खड्ड्यांच्या या परिस्थितीला स्थानिक रेल्वे प्रशासन व नगरपालिका प्रशासन जबाबदार आहेत, कारण रस्त्याच्या मालकीच्या वादातून हे काम खोळंबले आहे.
रस्ता नेमका कुणाचा
रेल्वेचे म्हणणे आहे की हा रस्ता आमच्या मालकीचा नाही तर नगरपालिका म्हणते रस्ता रेल्वेचा आहे. परंतु यांच्या दोघांच्या वादात भुसावळकर हैराण झाले आहेत. या रस्त्यावरून रेल्वे कर्मचाऱ्यांचा जास्त वापर होतो व हा रस्ता रेल्वे स्टेशन, पंधरा बंगला, रेल्वेचे आरओएच शेड तसेच पीओएच, एमओएच शेडला नोकरी करणारे रेल्वे कर्मचारी ये - जा करत असतात. रेल्वेनेच हा रस्ता दुरुस्त किंवा नवीन डांबरीकरण करावे, अशी मागणी रेल्वे कर्मचाऱ्यांनीच केली आहे. काही लोक या रस्त्यावरून पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचल्याने खड्ड्याचा अंदाज न आल्याने पडले असून, त्यांना दुखापत झाली आहे. यात एखाद्याचा जीव गेल्यास हा रस्ता दुरुस्त होईल का, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
रेल्वेने स्थानकाबाहेर एवढी सुविधा केली; परंतु रस्त्याचा विसर पडला की काय? रेल्वेने हा रस्ता रेल्वे कर्मचाऱ्यांचा सोयीसाठी दुरुस्त करावा अन्यथा रेल्वे कर्मचारीच आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.
खराब रस्त्यामुळे बऱ्याच रेल्वे प्रवाशांची गाडीदेखील चुकली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना नोकरीवर जाण्यासाठी उशीरपण होत आहे. या सर्व गोष्टींना रेल्वे प्रशासनच जबाबदार आहे.
याबाबत रेल्वेचे डीआरएमएसएस केडिया यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
---
कोट - रेल्वे स्टेशन ते बाजारपेठ पोलीस स्टेशनपर्यंतच्या रस्त्यावर ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत, त्यात मुरूम टाकून ते नगरपालिकेमार्फत बुजविण्यात येतील.
-संदीप चिद्रवार
मुख्याधिकारी, नगरपालिका, भुसावळ
फोटो - स्टेशन रोडवर मोठमोठ्या खड्ड्यात पाणी साचल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागते. (छाया : श्याम गोविंदा) ९/८