-विशाखा देशमुख
ए आजी... मी या बाहुलीची वेणी घालू? ही माझ्याशी बोलत का नाही? शाळा सुरू झाली की मी हिला पण शाळेत घेऊन जाईल. छोट्या नातीची सतत बडबड चालू होती. पुतण्याची चार वर्षाची मुलगी एकटी आमच्याबरोबर जळगावला आली होती. ती आल्यावर काही वेळातच काचेच्या शोकेसमध्ये ठेवलेल्या बाहुल्या, भातुकलीचा खेळ, बाकी खेळणी सारं सारं आपसूकच खाली येऊन घर भरून गेलं.
‘ए आजी, तू पण खेळ नं माझ्यात’.
खरं तर घरातली कामं वाट पहात होती. पण तिच्या हट्टापुढे मीपण लहान होऊन गेले. मनात विचार आला किती पटकन निघून गेले ते दिवस. तेव्हाचं ते उत्स्फूर्त, स्वच्छंदी बालपण किती छान होतं. कसला राग नाही, लोभ नाही. मस्त हसावं, रुसावं, खेळावं, बागडावं आलेला क्षण आनंदात घालवावा इतकंच. लहानपणी घरापलीकडे जग नसतं. आईवडिलांशिवाय दुसरे देव नसतात. ते जग किती चिमुकले. पण आनंदी. ते देव रागावले, त्यांनी मारले तरी त्यातसुद्धा किती सुख असते. मी अशा विचारात मग्न असताना तिची सगळी भांडी छान मांडून झाली होती. सुंदर घर सजवलं होतं तिनं. सगळंच होतं त्या खेळण्यात. पोळपाट लाटणे, छोटे रॅक, पेले, वाट्या, चमचे, चिमटा, गॅस शेगडी, लाल रंगाचा सिलिंडर, कुकर असं सगळंच. ते पाहून वाटलं. खरंच नकळत्या वयातील मुली आपल्या संसाराचं चित्र किती छान रेखाटत असतात.
तिच्या पद्धतीने भांडी मांडून ती तिच्या विश्वात रममाण झाली होती आणि मी मात्र माझ्या बालपणातल्या अंगणात जाऊन पोहोचले होते.
वडिलांची सतत बदली होत असल्याने आम्ही काही वर्ष निसर्गरम्य अशा इगतपुरी गावी होतो. आमच्या घरासमोर मोठे ग्राउंड होते. उजवीकडे डोंगर होते. त्या डोंगरावरून पावसाळ्यात सतत झरे वाहत असत. सकाळी तर धुक्याची चादर पांघरलेली असायची. घराच्या डावीकडे एकसारखे बंगले होते. त्याच बंगल्यात आमची आजी राहायची. बाजूच्याच घरांमध्ये आमच्या वयाच्या मैत्रिणी राहात असल्याने आम्ही जास्त आजीकडेच असायचो. तिच्या दारापुढे मोठे जांभळाचे झाड होते. त्याला सीझनमध्ये खूप जांभळे लगडलेली असायची. झाड हलवले की भरपूर जांभळे खाली पडायची. अतिशय गोड असणाऱ्या त्या जांभळाची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. खूप मोठ्या असणाऱ्या बंगल्याच्या मागील दारी प्रचंड फुलांनी बहरलेला बगिचा होता. विशेष करून हजारी मोगरा आणि वेली गुलाब खूप असायचे. तिथेच आम्हा मैत्रिणींचा भातुकलीचा खेळ रंगायचा.
पोहे, गूळ, शेंगदाणे, खोबरे अशा खाऊच्या पानावर वाढलेल्या पंगती बसायच्या.
एकदा मोठ्यांच्या मदतीने केलेली चुलीवरची खिचडी पण आठवते आहे. लाकडं वगैरे गोळा करून पेटवलेल्या चुलीत खरं तर धूर डोळ्यात जात होता. पण तीही वेगळी मजा अनुभवत प्रत्येकाने घरून आणलेले डाळ, तांदूळ, तेल, शेंगदाणे असं जमवून केलेली, केळीच्या पानात गरमागरम खाल्लेली खिचडी खाऊन सर्व तृप्त झाले होते. याच खेळात थाटात लग्न पण लागत.
‘विहिणबाई विहिणबाई
उठा आता उठा,
भातुकलीचा सारा
तुम्ही केला चट्टा मट्टा...’
अशी झोकात गाणी पण म्हणत असू. दिवस कसा पटकन निघून जाई.
आठवणींच्या राज्यात विहार करत असताना एक प्रसंग आठवतोच आठवतो.
आम्ही सगळे साधारण चौथी-पाचवीत असू. बरंच कळायला लागलं होतं. आजूबाजूच्या इतर बंगल्यातील बच्चे कंपनी आणि मैत्रिणींचे भाऊ पण आमच्यात सामील होऊ लागले होते.
भातुकलीच्या या खेळात एकदा बाहुला-बाहुलीचे लग्न थाटात करायचं ठरलं. अगदी बैठक घेऊन नियोजन केले गेले. बाहुला बाहुली कोण हातात धरणार? फुलांच्या मुंडावळ्या कोण करणार? अंतरपाट धरायला मुलाचे व मुलीचे मामा कोण होणार? असं सगळं ठरलं.
या सोहळ्याला सगळे छान कपडे घालून आले. मधुराला हातात सजवलेली बाहुली दिली आणि दुसऱ्या मैत्रिणीच्या भावाच्या केतनच्या हातात बाहुला दिला. जमेल तशी मंगलाष्टके म्हणून हे लगीन झोकात लागलं. मग घरूनच आणलेले जेवण अंगत पंगत करून खाल्ले. कुणी पोहे, उपमा, गूळ पोळीचा लाडू, कुणी लोणचं पोळी तर कोणी पुरी बटाटा भाजी असे आणले होते. हसत खेळत जेवणं झाली. बाहुलीचं लग्न तर छान झालं. पण खेळातल्या मधुरा आणि केतन यांची तेव्हापासून खरंच मैत्री झाली. या मैत्रीतून त्यांचं प्रेम फुलायला सुरुवात झाली. होती. पण किशोरावस्थेत दोघांनी पदार्पण केले होते. हे वय म्हणजे बालपण संपले नसते व तारुण्यही आलेले नसते. मन मात्र विलक्षण तरल बनते. थोड्या आनंदाने फुलून यावे व थोड्या दुःखाने कोमेजून जाण्याचं हे वय असतं. त्यांना समजावून सांगितल्यावर त्यांनी त्यांच्या मैत्रीला पूर्णविराम दिला. आणि अभ्यासाला लागले. परंतु बारावी झाल्यावर मधुराने विचारले केतन कुठे असतो? अजूनही कुठेतरी तिच्या मनात त्याने घर केले होते.तो मात्र पुण्याला शिकायला निघून गेला होता. तिचे प्रेम अधुरेच राहिले होते ते सगळे आठवून नकळत अरुण दाते यांचे गीत
‘भातुकलीच्या खेळामधले
राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला
अधुरी एक कहाणी’
या गीताची आठवण होते. इतकी वर्षे होऊनही अशा आठवणींचा पाऊस आपल्याला चिंब करतो. सुट्टीमध्ये वडीलधारी मंडळी झाडाला झोके बांधून देत.
लहानपणी झाडाला टांगलेल्या झोपाळ्यावर बसून उंच झोके घेताना स्वर्ग अगदी जवळ असल्याचा साक्षात्कार होऊन मन आनंदाने फुलून जात असे. पण आता? असा झोका कितीही उंच गेला तरी आकाश आपल्यापासून फार फार दूर आहे याची जाणीव होऊन मन उदास होऊन जाते. हे सगळं आठवत असताना समोर खेळणाऱ्या नातीने कपात पाणी घालून आजी, चहा घे ना म्हणून आग्रह केला. म्हणून मी भानावर आले. पण थोड्यावेळ का होईना भातुकलीचा खेळ खेळून बालपणात फेरफटका मारून आले.