जळगाव : सध्या पावसाळा असल्याने उघड्यावरील खाद्यपदार्थ खाण्याचे टाळणे, जितके महत्वाचे आहे. तितकेच पावसाळ्यात दूषित पाणी पिण्याचे प्रमाण टाळणेदेखील महत्वाचे आहे. कामानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर,बाहेरील पाणीच प्यावे लागते. मात्र, हे पाणी स्वच्छ आहे का, हे पाणी भांड्यात किंवा टाकीत टाकले जाते, ते गाळून टाकले जाते का, पाण्याचा साठा असलेली भांडी, टाक्या स्वच्छ आहेत का, हे पाहणेदेखील गरजेचे आहे. विशेष म्हणजे सध्याचे वातावरण पाहता आणि ज्यांना सर्दी व तापाची किरकोळ लक्षणे आहेत, अशा रूग्णांनी तर पाणी उकळून पिण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ञांकडून करण्यात येत आहे.
दूषित पाण्यामुळे रूग्णालयांमध्ये कॉलरा, गॅस्ट्रो, टाईफाईडच्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तसेच काविळचे रूग्ण सुद्धा आढळून येत आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून नागरिकांनी स्वच्छ पाणी पिण्या बरोबरच, उकळलेले पाणी पिणे महत्वाचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
इन्फो :
दूषित पाण्यामुळे होणारे आजार
- दूषित पाण्यामुळे मुख्यत्वे टायफॉईड, कॉलरा, गॅस्ट्रो, काविळ हे आजार होण्याची शक्यता जास्त आहे.
- दूषित पाण्यामुळे उद्भवणारे आजार, हे जास्त करून पावसाळ्यातच उद्भवत असतात.
इन्फो :
आजाराची लक्षणे
- दूषित पाणी प्यायल्यामुळे पावसाळ्यात कॉलराचे होण्याचे प्रमाण सर्वाधिक जास्त दिसून येते. यामध्ये जुलाब, उलट्या व शरीरातील पाण्याची पातळी कमी होत असते.
- दूषित पाण्यामुळे टाईफाईड आजाराचेही प्रमाण मोठे असून, यामध्ये ताप, उलटी, सर्दी, भूक मंदावणे आदी लक्षणे आढळून येतात.
-तसेचर टाईफाईड मध्ये रूग्णांच्या पोटात दुखते, वेळेवर उपचार न घेतल्यास प्रकृती अधिकच खालावते.
- तसेच काही जणांना काविळचींही बाधा होत असल्याचे मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी सांगितले.
इन्फो :
पाणी उकळून प्यायलेले बरे
- दरवर्षी पावसाळ्यातच या आजारांचे प्रमाण वाढत असल्यामुळे नागरिकांना पाणी गाळून आणि उकळून पिणे महत्वाचे आहे. तसेच पाण्याचा साठवण करणारी भांडी नेहमी स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. टाक्यांमध्ये जास्त दिवस साठवणूक केलेले पाणी न पिण्याचे आवाहनही वैद्यकीय तज्ञांकडुन करण्यात येत आहे.
इन्फो :
शहरात दररोज होतो ८० ते ९० दशलक्ष पाणी पुरवठा
जळगाव शहरात गेल्या अनेक वर्षांपासून वाघुर धरणावरून पाणी पुरवठा केला जात आहे. मनपा पाणी पुरवठा विभागातर्फे शहरात दररोज वेगवेगळ्या भागात पाणी पुरवठा केला जात आहे. दररोज ८० ते ९० दशलक्ष पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी स्वच्छ राहण्यासाठी नियमित तुरटीसह पाणी शुद्ध करण्याचे आौषध टाकूनच पाणी पुरवठा केला जात आहे.