सागर दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या दोन महिन्यांपूर्वी राज्य सरकारने ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावांमधील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील ७०८ शाळांपैकी सद्यस्थितीला ४५६ शाळा उघडल्या आहेत. तर ५७०५ शिक्षक, कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असून शेकडो शिक्षकांनी अद्यापही लसीकरण करून घेतलेले नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद होत्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन सुविधा नसल्यामुळे ते विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत होते. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानुसार १५ जुलैपासून जळगाव जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीच्या वर्गांची दारे विद्यार्थ्यांसाठी उघडली. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद मिळाला. मात्र, त्यानंतर विद्यार्थी संख्या वाढू लागली. सद्यस्थितीला ७०८ शाळांपैकी ४५७ शाळा सुरू असून दीड लाख विद्यार्थ्यांपैकी ५१ हजार ६७ विद्यार्थी शाळांमध्ये हजेरी लावत आहेत.
शेकडो शिक्षकांनी घेतली नाही लस...
कोरोनामुक्त गावांमधील शाळांमधील एकूण शिक्षक व कर्मचाऱ्यांपैकी ५ हजार ७०५ शिक्षक, कर्मचाऱ्यांनी लसीचा डोस घेतला आहे. मात्र, शेकडो शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अद्याप पहिला डोस सुध्दा घेतलेला नाही. त्यामुळे शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
५४ हजार पालकांची संमती
गावांमधील शाळा सुरू करण्यापूर्वी पालकांकडून संमतीपत्रही घ्यावे अशा सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावांमधील ५४ हजार १२० पालकांनी पाल्यास शाळेत पाठविण्यास संमती दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात ५१ हजार विद्यार्थी शाळेत हजेरी लावत आहेत.
लसीकरण झालेल्या शिक्षक, कर्मचाऱ्यांची संख्या
अमळनेर (७२२), भडगाव (४६८), भुसावळ (२९९), बोदवड (९१), चाळीसगाव (९६६), चोपडा (४३५), धरणगाव (३२६), जळगाव (३२३), जामनेर (३२४), मुक्ताईनगर (२८९), पारोळा (४१६), रावेर (४६९), यावल (५७७).
माहिती उपलब्ध नाही...
दरम्यान, दुसरीकडे प्राथमिक शिक्षण विभागाकडे किती शिक्षक व कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले याची माहिती उपलब्ध नव्हती. काही दिवसांपूर्वी शासनाने शिक्षकांची लसीकरणाची माहिती मागविली होती. त्याबाबत लोकमत प्रतिनिधीने शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.