लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला. त्यात जळगाव जिल्ह्यातील ४०२ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी एनएमएमएसची परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने ६ एप्रिल रोजी घेण्यात आली होती. आठवीतील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. परीक्षेसाठी जळगाव जिल्ह्यातून २ हजार ९७ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील १ हजार ७८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती तर ३१० विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली होती. नंतर २६ जुलै रोजी विद्यार्थ्यांच्या प्राप्त गुणांची यादी परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर झाली होती. मात्र, काही दुरुस्त्यांसाठी ४ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना मुदत देण्यात आली. अखेर आता १८ ऑगस्ट रोजी शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे.
परीक्षेत हे विद्यार्थी चमकले
एससी संवर्गातून नवीन दीपक जाधव (ए.बी. बॉईज स्कूल, चाळीसगाव), एसबीसी संवर्गातून हिमांशू किरण कुंवर (साने गुरुजी स्कूल, अमळनेर), व्हीजे संवर्गातून पल्लवी दत्तासिंग परदेशी (केडीएनएम स्कूल, पाळधी ता. जामनरे)., एनटी-डी संवर्गातून कुणाल विजय पाटील (इंदिरा ललवाणी स्कूल, जामनेरपुरा)., ओबीसी संवर्गातून प्रियंका सचिन खैरनार (ए.बी. गर्ल्स स्कूल, चाळीसगाव), जनरल संवर्गातून प्रांजल दत्तात्रय कोठावदे (काकासाहेब पूर्णपात्रे स्कूल, चाळीसगाव), एनटी-बी संवर्गातून यश नितीन कुमावत (ए.बी. बॉईज स्कूल, चाळीसगाव), एनटी-सी संवर्गातून हर्षल नंदू पाटील (सेकंडरी स्कूल, वाकोद), ईडब्ल्यूएस संवर्गातून नरेंद्र प्रितेश पाटील (शिंदे विद्यालय, पाचोरा) आदी विद्यार्थी सर्वाधिक गुण मिळवून परीक्षेत चमकले आहेत.
वर्षाला १२ हजार रुपये शिष्यवृत्ती
शिष्यवृत्तीच्या परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्याला इयत्ता बारावीपर्यत अटींच्या अधीन राहून दरमहा एक हजार रुपये म्हणजेच वर्षाला १२ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने (एनसीईआरटी) आर्थिक दुर्बल घटकातील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, उर्दु, सिंधी, कन्नड व तेलगू या माध्यमातून देता येते.
संवर्गनिहाय पात्र विद्यार्थी संख्या
ईडब्ल्यूएस : ०८
जनरल : १७५
एनटी-बी : ११
एनटी-सी : १२
एनटी-डी : ०१
ओबीसी : ८८
एसबीसी : १०
एससी : ५६
एसटी : ३२
व्हीजे : ०९