या प्रणालीमुळे बसची प्रतीक्षा करत स्थानकावर ताटकळत बसण्याचा प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. जालना विभागातील चार आगारांच्या बसस्थानकात व्हेईकल ट्रेकिंग सिस्टीम बसविण्यात आली आहे. विभागातील प्रत्येक बसला या प्रणालीचे युनिट कार्यान्वित केले आहे. ५०० मीटर परिसरात बस येताच बसस्थानकावरील स्क्रीनवर कोणती बस येत आहे? कुठे जाणार आहे? कोणत्या फलाटावर लागणार आहे? याची सूचना प्रवाशांना मिळणार आहे. त्याचबरोबर रेल्वेप्रमाणे बसचे लोकेशनदेखील लवकरच कळणार आहे. त्यामुळे प्रवाशांना बसची वेळेवर माहिती अद्ययावत सुविधा उपलब्ध होणार आहे.
बसची गती आणि लोकेशनही कळणार
प्रवासादरम्यान ब्रेकडाऊन होणाऱ्या बस शोधणे सुलभ होणार आहे. बस कुठे व का उभी आहे, तसेच बसची गती किती आहे, ओव्हर स्पीड आहे का, याची माहिती या प्रणाली अंतर्गत अधिकाऱ्यांना बसल्या जागी मिळणार आहे. त्यामुळे लागणाऱ्या गरजेची पूर्तता करणे सुलभ होणार आहे.
बसस्थानकात लागले मोठे स्क्रीन
रापमच्या जालना विभागात चार मोठे बसस्थानक आहेत. प्रत्येक बसस्थानकावर ४२ इंची स्क्रीन लावण्यात आली असून पॅसेंजर इन्फॉरमेशन सिस्टीमद्वारे प्रवाशांना ते प्रतीक्षा करीत असलेल्या बसची माहिती कळू शकणार आहे. या स्क्रीनवर प्रत्येक गाडी सध्या कुठल्या ठिकाणी आहे, स्थानकात पोहोचण्यास किती वेळ लागेल, याची माहिती मिळणार आहे.
चालकांच्या निष्काळजीपणाला बसणार चाप
बस विनाकारण लेट होत असेल, वाहक-चालकाकडून कोठे टाइमपास केला जात असेल तर लगेच कळणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल. गाड्यांना वेळ पाळणेही सोपे होईल. तसेच बसची ओव्हरस्पीड संबंधित निरीक्षकांना या प्रणालीतून समजणार असल्याने चालकांनाही अनुपालन करावे लागणार आहे.
प्रवाशांना ॲपवर कळणार सर्व माहिती
रापमच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ॲप विकसित होत आहे. याद्वारे प्रवाशाला कोठून कोठे जायचे यासाठी त्या मार्गावरून काेणती बस कधी जाणार, बसचे चालक, वाहकांचे मोबाइल क्रमांक, बॅच नंबर आदी लोकेशन मायक्रो मॅपप्रमाणे उपलब्ध होणार आहे.
व्हेईकल ट्रेकिंग सिस्टीममुळे प्रवाशांना बस ट्रॅक करता येणार आहे. त्यावरून किती वेळ लागणार हे समजू शकेल. प्रवासाचे नियोजन करता येईल. तासनतास ताटकळत थांबायची गरज पडणार नाही. या प्रणालीमुळे प्रवाशांना सुविधा होणार आहे.
-प्रमोद नेहूळ, विभागीय नियंत्रक, जालना