जीएसटीच्या नवीन बदलांमुळे व्यापारी, उद्योजक हैराण झाले आहेत. याप्रकरणी मध्यंतरी सीएनी एकत्रित येऊन कायद्यात होणारे बदल एकदाच करून त्यांची अंमलबजावणी करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन दिले होते; परंतु त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. दरम्यान गेल्या महिन्यात नाशिक आणि पुणे येथील जीसएसटीच्या पथकाने जालन्यातील स्टील उद्योगांसह अन्य उद्योजकांकडे अचानक पाहणी करून झाडाझडती घेतली.
यावेळी स्क्रॅप खरेदी केलेल्या बिलांमध्ये मिसमॅचचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता; परंतु येथील उद्योजकांनी अत्यंत काळजीपूर्वक बिलांची नोंद ठेवली होती. तसेच स्क्रॅपची गाडी आल्यावर त्या गाडीचे छायाचित्र तसेच चालकाचे छायाचित्र काढून त्यांची नोंद ठेवली जाते. ही सर्व नोंद आलेल्या जीएसटीच्या अधिकाऱ्यांना दाखविण्यात आल्याने त्यांचे समाधान झाले.
विशेष म्हणजे ज्यावेळी जीएसटी भरत असलेल्या यादीत ज्या खरेदी दारांची नोंद आहे, अशांकडूनच ते खरेदी केले आहे; परंतु संबंधित खरेदीदाराने आमच्याकडून जीएसटी वसूल करून तो विभागाला न भरल्यास त्याला आम्ही कसे जबाबदार, असा सवालही येथील स्टील उद्योजकांनी जीएसटीच्या अधिकाऱ्यांना केला होता. त्यामुळे ते अधिकारीही थक्क झाले होते. गुरुवारी सकाळपासूनच एमआयडीसीतील एका कारखान्यावर सीजीएसटीच्या पथकाने अचानक छापा टाकला. कंपनीसह संबंधित कंपनी मालकाच्या घरीही या पथकातील अधिकाऱ्यांनी भेट देऊन झाडाझडती घेतल्याने उद्योग क्षेत्रात दिवसभर चर्चेला उधाण आले होते.
चौकट
व्यापार, उद्योग करावा की...
जीएसटी आणि सीजीएसटी या दोन विभागाच्या सततच्या कारवाईमुळे व्यापारी, उद्योजक हैराण झाले आहेत. यापूर्वी राज्य जीएसटीने मोंढ्यातील चार बड्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली होती. तसेच पुन्हा स्टील उद्योजकांकडून विचारणा केली. यासह आता तर सीजीएसटीच्या पथकानेही कारवाई केल्याने व्यापारी आणि उद्योजक हैराण झाले असून, केवळ हेच एक काम आमच्याकडे नसल्याने आम्ही त्रस्त झालो आहोत, अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या आहेत.