जालना : ग्रामीण भागाच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातील तब्बल ३१७ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा आजारी पडली असून, कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही कामाचा ताण वाढला आहे.
कोरोना काळात आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे महत्त्व आणि त्यांनी केलेल्या कामाची सर्वस्तरातून दखल घेतली गेली. या कोरोना योद्ध्यांचा ठिकठिकाणी गौरवही केला जात आहे. परंतु, ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याची सेवा देणाऱ्या आरोग्य केंद्रातील रिक्तपदांचा प्रश्न वर्षानुवर्षापासून कायम आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे काही महिन्यांपूर्वी भरण्यात आली आहेत. परंतु, वर्ग तीन- चारची ३१७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामकाजावर परिणाम होत आहे.
कर्मचाऱ्यांचा मोठा अभाव
जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमधील आरोग्य सेवक पुरूष, आरोग्य सेविका महिला, औषध निर्माण अधिकारी यांच्यासह वर्ग तीन व वर्ग चारची इतर पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे रूग्ण सेवेसह शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे.
ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांमधील रिक्तपदांचा अहवाल वेळोवेळी वरिष्ठांमार्फत शासनाकडे सुपूर्द केला जातो. वरिष्ठांच्या सूचनेनुसारच रिक्तपदे भरण्याची प्रक्रिया केली जाते. सध्या जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांच्या मार्फत रूग्णांना सेवा दिली जात असून, आरोग्याबाबत असलेल्या शासकीय योजनांचीही प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.
- विवेक खतगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी
आरोग्य केंद्रांची संख्या
४३
२१८
एकूण कर्मचारी संख्या
३४४
४३६
एकूण रिक्त कर्मचारी संख्या
९३
२२४