गुरुवारी कृष्णा तवरावालाचा विशेष सत्कार सोहळा आयोजित केला होता. यावेळी खोतकर बोलत होते. यासंदर्भात कृष्णा तवरावाला याच्याशी यावेळी संवाद साधला असता अंगावर काटे येणारे अनुभव त्याने विशद केले. अकोला येथे सीए फाउंडेशनची दीड वर्षापूर्वी तयारी करीत असताना वर्गातच लाखोमधून एखाद्यास होणारा जीबीएस-एएनआय हा आजार जडला. हा आजार म्हणजे मनुष्याचे सर्व शरीर ढिले होते. यामुळे मनुष्याला हालचाल करणेही अवघड होते. हा गंभीर आजार जडल्याने गेल्या दीड वर्षापासून कृष्णा हा अंथरुणावर खिळून होता. या दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी त्याला उपचारानंतर डोळे आणि हातपाय हालविता आले. याचाच लाभ घेत त्याने ठरविलेले ध्येय गाठण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. यासाठी कृष्णाचे आई-वडील तसेच तवरावाला परिवारातील सदस्यांनी त्याला प्रेरणा दिली. याचवेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर हे देखील कृष्णाच्या प्रकृतीची नेहमी विचारपूस करून डॉक्टरांशी सल्लामसलत करत. यावेळी ॲड. अनुराग कपूर, ॲड. सतीष तवरावाला, डॉ. तवरावाला यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवाराने जगदीश तवरावाला यांना हिम्मत दिली.
या सर्व प्रेरणात्मक साथीमुळे कृष्णाने अशाही परिस्थितीत सीए फाउंडेशनची परीक्षा दिली आणि त्यात नेत्रदीपक यशही मिळविले. परिस्थिती कशीही असली तरी तुमची जिद्द आणि चिकाटी ध्येयाप्रती बांधील असल्यास काय होऊ शकते हे कृष्णाने सिद्ध केले. अन्य विद्यार्थ्यांसाठी कृष्णा हा आज एक आयडॉल ठरला आहे.
चौकट
सीए होऊन आत्मनिर्भर होणार
कृष्णाचे प्राथमिक शिक्षण सेंट मेरी शाळेत झाले. नंतर सीएच्या तयारीसाठी अकोला येथे खासगी संस्थेत प्रवेश घेतला. आजारातून बरे वाटल्यानंतर ध्यानसाधना केली. एकूणच कृष्णाची ही एकीकडे आजाराशी आणि दुसरीकडे अभ्यासाची लढाई होती. त्यात त्याने आजारावर मात करून अभ्यासाची लढाई जिंकली, यात आई-वडिलांसह अन्य परिवाराची साथ मिळाल्याने हे शक्य झाले.
- कृष्णा तवरावाला