जालना : मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी वातावरणात झालेल्या बदलामुळे रबी हंगामातील गहू, हरभरा पिकांवर रोगराई पडली आहे. यावर फवारणी करण्यासह इतर कामांसाठी अंबड तालुक्यातील रोहिलागड, खेडगाव, निहालसिंगवाडी, चिकनगाव परिसरात मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. हेच चित्र मंठा तालुक्यातही असल्याचे दिसून आले.
मागील तीन ते चार वर्षात गतवर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. या पावसामुळे खरीप पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेल्याने शेतकऱ्यांची आशा रबी पिकांवर होती. सध्या अनेक गावांमध्ये रबी पिकेही चांगली आली आहेत; परंतु अनेक गावांमध्ये तूर काढणीसह मोसंबी आळ्यांची टाचणी करणे, गहू पिकाला पाणी देणे, डाळिंब छाटणी करून बागेतील कचरा जमा करण्याचे काम सुरू आहे. यातच काही गावांमधील मजूर ऊसतोडणीसाठी गेले आहेत. असे असतानाच यंदा रबी पिकांचा पेराही गावोगाव वाढला आहे. त्यामुळे अंबड तालुक्यातील किनगाव, कवचलवाडी यांसह इतर काही गावांमध्ये मागणीच्या तुलनेत मजुरांची टंचाई जाणवत आहे.
काय म्हणतात गावोगावचे शेतकरी
रोहिलागड परिसरातील काही मजूर शेंद्रा एमआयडीसीमध्ये कामावर जातात. याचा परिणाम गावात मजूर मिळण्यावर होत आहे. मजूरांकडून करून घेणारी कामे घरीच कुटुंबीयातील सदस्यांकडून करून घेतली जातात, अशी माहिती रोहिलागड येथील कल्याण टकले यांनी दिली.
जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी परिसरात खरीप हंगामातील कापूस वेचणीसाठी मजुरांची अधिक टंचाई जाणवते. अशा वेळी आम्ही विदर्भातून मजुरांची कापूस वेचणीसाठी ने-आण करतो, इतर वेळी मजुरांची टंचाई जाणवत नाही, अशी माहिती टेंभुर्णी येथील शेतकरी संतोष शिंदे दिली आहे.
शेतीतील कामे अंगमेहनतीची असतात. त्यामुळे काही प्रमाणात मजूर शेतीची कामे करण्याकडे दुर्लक्ष करतात. आमच्या गावात सध्या गहू, हरभरा खुरपणीची कामे सुरू आहेत. ही कामे गाव परिसरात सुरू असल्याने मजुरांची सद्यस्थितीत टंचाई जाणवत आहे, अशी माहिती बदनापूर तालुक्यातील रोषणगाव येथील अचितराव देशमुख यांनी दिली.
यंत्राने होणारी कामे
पूर्वी होणाऱ्या बैलशेतीचा उपयोग आता ट्रॅक्टर शेतीत झाला आहे. यासोबतच फळपिकांवर फवारणी यंत्राच्या सहाय्याने केली जात आहे.
कृषी यंत्रांनी घेतली मजुरांची जागा
लागवड केलेल्या उसाची सरी फोडण्यासाठी छोट्या ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो. खुरपणीसाठी मजूर वेळेवर न मिळाल्यास औषधांची फवारणी करून गवत जाळले जाते, तसेच अनेक गावांमध्ये पिकांना ठिबकद्वारे पाणी दिले जात आहे. एकूणच कृषी यंत्रामुळे अंगमेहनतीची कामे आता राहिली नाहीत.