राजूर जिल्हा परिषद गटातील सर्वात मोठे गाव असलेल्या चांधई एक्को येथील ग्रामस्थांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह नागरिकांची मध्यंतरी बैठक घेऊन बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी गावचे भूमिपुत्र पोलीस उप-निरीक्षक अंबादास ढाकणे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीमुळे गावात होणारे वैमनस्य रोखण्यासाठी निवडणूक बिनविरोध करण्याचा ठराव मांडला होता. निवडणुकीमुळे अनेक गावांमध्ये भावकीसह घराघरात दोन गट पडून कायमस्वरूपी वैमनस्य निर्माण होते, तसेच अंतर्गत राजकारणामुळे विकास कामाला खीळ बसते. गावात बिनविरोध निवड झाल्यास विकास कामाला चालना मिळून गावात सलोख्याचे संबंध कायम राहतात, असे अंबादास ढाकणे यांनी सुचविले होते. यानुसार ग्रामस्थांनी गावात बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये नव्या व जुन्यांचा मेळ बसवून ११ सदस्यांची ग्रामस्थांमधून निवड करण्यात आली आहे. यामध्ये अनिता तळेकर, लक्ष्मी बेडके, कमल गंगावणे, संगीता पवार, उषा ढाकणे, नंदा ढाकणे, रामदास तळेकर, विष्णू मोरे, आनंदा गंगावणे, विष्णू ठोंबरे, सुरेश टोम्पे यांची सदस्यपदी निवड झाली. सोमवारी उर्वरित अर्ज मागे घेऊन अकरा सदस्यांनी नामांकन ठेवले आहे. त्यामुळे बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले. यामध्ये अनिता तळेकर यांची सरपंचपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राजूर गटात सात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या. यामध्ये चांधई एक्को व उंबरखेडा दोन ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या असून, लोणगाव, थिगळखेडा, पिंपळगाव थोटे, पळसखेडा पिंपळे, चांधई टेपली येथे निवडणुका होत आहेत. भरथंडीच्या कडाक्यात पाचही गावांत निवडणुकीने वातावरण गरम झाले आहे.
चौकट
उंबरखेडा येथेही सातच अर्ज राहिल्याने तेथील ग्रामपंचायतचीही निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये सदस्यपदी सोनाली होलगे, रेणुका होलगे, सिंधुबाई होलगे, दीपक होलगे, वंदना फुके, राजेंद्र पंडित यांचा समावेश आहे. बिनविरोध निवड झालेल्या ग्रामपंचायतीसाठी आ. नारायण कुचे यांनी वीस लाख तर जिल्हा परिषद सदस्य शोभा पुंगळे यांनी पंचवीस लाखांचा निधी जाहीर केलेला आहे. त्यामुळे दोन्ही गावाला विकास कामाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.