विदर्भातील अचलपूर येथील समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन संचालित स्वर्गीय छगनलाल मुलजीभाई कढी कला महाविद्यालय, जिल्हा अमरावती आणि विदर्भ अर्थशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय प्रा. भास्करराव ढाले स्मृती ऑनलाइन व्याख्यान शनिवरी पार पडले. या व्याख्यानाचा विषय हा भारतीय शेतीची अवस्था हा होता. प्रास्ताविक व स्वागतपर भाषण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. काशीनाथ बऱ्हाटे यांनी केले, तर प्रा. भास्कर ढाले स्मृती व्याख्यानाचे प्रयोजन व परिषदेची भूमिका डॉ. पिस्तूलकर कार्य अध्यक्ष विदर्भ अर्थशास्त्र परिषद यांनी मांडली. डॉ. विनोद गावंडे अध्यक्ष विदर्भ अर्थशास्त्र परिषद यांनी भारतीय शेतीची व्यवस्था व अवस्था यातील भेद विस्तृत स्वरूपात सांगितला.
यावेळी प्रमुख वक्ते तथा अंबड येथील प्रा.डॉ. मारुती तेगमपुरे विस्तृत शेती समोरील आव्हाने उपाय यावर मुद्देसूद मार्गदर्शन केले. भारतीय शेतीचे वास्तव चित्र, शेतकरी, शेतमजूर, श्रीमंत शेतकरी या संकल्पना स्पष्ट केल्या. नाबार्डचे कार्य भारतातील सबसिडीची जागतिक पातळीवर तुलना व भारतीय शेतीचे प्रश्नासंबंधी आपला दृष्टिकोन कसा असावा उद्योगधंद्यातील गुंतवणूक व शेतीतील गुंतवणूक यातील तुलना व त्यामुळे निर्माण होणारा रोजगार यांचे प्रतिपादन केले.
शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळणे आवश्यक आहे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, आज रोजी देशात कृषी उत्पन्न बाजार समित्यांची (एपीएमसी) संख्या ४४७७ इतकीच असून, खऱ्या अर्थाने देशाला ४२ हजार एपीएमसी आवश्यकता आहे. आजमितीस फक्त ६ टक्केच व्यवहार एपीएमसीच्या माध्यमातून पार पडतात. उर्वरित ९४ टक्के शेतमालाचे व्यवहार एपीएमसीच्या बाहेरच होतात. आजही ८६ टक्के शेतमालाचे व्यवहार जिल्ह्यांतर्गतच होतात. अशा परिस्थितीत एपीएमसीची संख्या वाढवण्याची नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सचिव श्रीपाद तारे यांनी शेतकरी आत्महत्या याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली.